Railways reduce vendor application fees taken for applying for approval of vendor with RDSO.
रेल्वेकडून लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांना चालना देण्यासाठी विक्रेता अर्ज शुल्कात कपात.
नवी दिल्ली : अधिकाधिक उद्योग भागीदारांना पुरवठा साखळीशी जोडण्यासाठी भारतीय रेल्वे निरंतर प्रयत्नरत आहे आणि उद्योजकांना व्यवसाय करणे सुलभ व्हावे यासाठी रेल्वेने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे केवळ प्रक्रिया पारदर्शक, कार्यक्षम आणि सुलभ झाल्या नाहीत तर उद्योगांना रेल्वेसाठी व्यवसाय करण्यासाठीचा खर्चही कमी झाला आहे.
विक्रेत्यांच्या सुविधेसाठी एक खिडकी ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून अर्ज दाखल करणे, शुल्क भरणा आणि अंतिम मंजूरी देण्यात येत आहे. यामुळे विक्रेत्यांना विविध कार्यालयांशी संपर्क करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत झाली आहे.
यादिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत रेल्वेने संशोधन अभिकल्पक आणि प्रमाणक संघटनेने (RDSO) विक्रेता अर्ज शुल्कात कपात केली आहे. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशिवाय इतरांसाठी पूर्वी 2.5 लाख रुपये तर, एमएसएमईंसाठी 1.5 लाख रुपये शुल्क होते. यात कपात करुन 2.5 लाख रुपयांवरुन 15000 रुपये आणि 1.5 लाख रुपयांवरुन 10000 रुपये करण्यात आले आहे. एमएसएमईंना प्रोत्साहन देण्यासाठी ही विशेष तरतूद करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे उद्योगासाठी लागणारा खर्च कमी होऊन मेक इन इंडिया अभियानाला चालना मिळेल. तसेच रेल्वेला पुरवठा साखळीत मोठ्या प्रमाणात उद्योजक मिळतील.