सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी लहान बाळांचे खादी कपडे व अनोख्या “यूज अँड थ्रो” हस्तनिर्मित कागदी चप्पल या खादीच्या नवीन उत्पादनांचे केले उद्घाटन.
एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी आज लहान बाळांचे खादी सुती कपडे व अनोख्या “यूज अँड थ्रो” हस्तनिर्मित कागदी चप्पल या खादीच्या दोन नवीन अनन्यसाधारण उत्पादनांची श्रेणी, नवी दिल्ली येथील कॅनॉट प्लेसमधील खादी इंडियाच्या महत्वाकांक्षी दालनामध्ये सुरू केली. यावेळी एमएसएमई राज्यमंत्री भानु प्रतापसिंग वर्मा आणि खादी व ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष विनय कुमार सक्सेना उपस्थित होते. दोन्ही मंत्र्यांनी खादीच्या वैविध्यपूर्ण उत्पादनांचे कौतुक केले.
नवीन उत्पादनांमध्ये मुलांसाठी प्रथमच खादीच्या सुती कपड्यांचा समावेश आहे. सुरवातीस, केव्हीआयसीने नवजात शिशूंपासून दोन वर्षापर्यंतच्या लहान बाळांसाठी बिनबाह्यांचे कपडे (झबली) आणि ब्लूमर आणि नॅपीजसह फ्रॉक्स ची निर्मिती केली. केव्हीआयसीने 100% हातमाग आणि हाताने विणलेल्या सूती कपड्यांचा वापर केला आहे जो मुलांच्या कोमल आणि संवेदनशील त्वचेवर मऊसूत असून त्यांना कोणत्याही पुरळ किंवा त्वचेवर जळजळ होण्यापासून प्रतिबंधित करतो.
भारतात प्रथमच विकसित केल्या गेलेल्या खादीच्या “यूज अँड थ्रो” हस्तनिर्मित कागदी चप्पलचे देखील उद्घाटन केले. या हस्तनिर्मित कागदी चप्पल 100% पर्यावरणपूरक आणि किफायतशीर आहेत. या चप्पल बनवण्यासाठी वापरलेला हस्तनिर्मित कागद पूर्णपणे लाकूड-मुक्त असून कापूस आणि रेशीम चिंध्या आणि तणांसारख्या नैसर्गिक धाग्यांनी बनलेला आहे. या चपला वजनाने हलक्या असून घर, हॉटेल खोल्या, रुग्णालये, प्रार्थनास्थळे, प्रयोगशाळा इत्यादी घरगुती वापरासाठी व प्रवासासाठी योग्य आहेत. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून देखील त्या प्रभावी आहेत.
लहान मुलांसाठीच्या खादी सुती कपड्यांची किंमत सर्वत्र प्रति कपडा 599 रुपये आहे; तर हाताने बनवलेल्या कागदाच्या चप्पलच्या प्रत्येक जोडीची किंमत फक्त 50 रुपये आहे. ही दोन नवीन उत्पादने कॅनॉट प्लेसमधील खादी दालनात तसेच केव्हीआयसीच्या ऑनलाइन पोर्टल www.khadiindia.gov.in वर खरेदी करता येतील.
नवीन खादी उत्पादनांचे उद्घाटन करताना राणे यांनी पर्यावरणपूरक आणि टिकाऊ उत्पादनांच्या मोठ्या प्रमाणावरील विपणनावर भर दिला. त्यांनी सांगितले की या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळवून केव्हीआयसी अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करू शकेल आणि ग्राहकांची संख्या मोठ्या फरकाने वाढवू शकेल.
केव्हीआयसीचे अध्यक्ष सक्सेना म्हणाले की, हस्तनिर्मित पेपर उद्योगाला आधार मिळावा आणि कारागिरांना शाश्वत रोजगार मिळावा या उद्देशाने केव्हीआयसीने हस्तनिर्मित कागद “यूज अँड थ्रो” चप्पल विकसित केली आहेत. ते म्हणाले की, केव्हीआयसी पहिल्यांदाच लहान बाळांच्या कपड्यांच्या उत्पादनात उतरली आहे.