दीर्घकालीन कोविड असलेल्या रुग्णांसाठी अस्थिरोगतज्ञांकडून लक्षणे आणि इतर मार्गदर्शन.
“गंभीर स्वरूपाच्या कोविड-19 संसर्गातून बरे झाल्यावर लगेचच अधिक व्यायाम करु नये”.
जगभरात अद्यापही अनेक ठिकाणी कोविडशी लढा देणे सुरूच असतांना या संदर्भात आणखी एक शब्द सध्या सातत्याने ऐकू येत आहे, ती म्हणजे, ‘दीर्घकालीन कोविड’ सध्या, होत असलेला हा कोविडचा प्रकार, डॉक्टर आणि रुग्ण दोघांसाठीही चिंतेचा विषय ठरला आहे. नवी दिल्लीतील, सेंट स्टिवन रुग्णालयात अस्थिरोग चिकित्सा विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ मॅथ्यू वर्गीस यांनी ट्वीटरवर कोविडनंतर येणाऱ्या शारीरिक समस्यांविषयी माहिती देतांना पहिल्यांदा ( लॉन्ग कोविड) हा शब्दप्रयोग केला. रुग्ण कोविडमधून बरा झाल्यानंतर, त्याला हा संसर्ग झाल्याच्या चार ते पाच आठवड्यानंतर अशी लक्षणे दिसू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
लॉन्ग- म्हणजेच दीर्घकालीन कोविड म्हणजे नेमके काय?
फुफ्फुसे आणि क्षयरोग तज्ञ, डॉ निखिल नारायण बांते, यांनी याविषयी माहिती देतांना सांगितले की, “कोविड-19 मधून बरे झाल्यानंतर, सुमारे 50 ते 70 टक्के रुग्णांना सौम्य किंवा कधी अगदी तीव्र स्वरूपाची लक्षणे जाणवू शकतात. ज्या रुग्णांना कोविडचा मध्यम अथवा तीव्र स्वरूपाचा संसर्ग झाला होता, त्यांच्या शरीरात ही लक्षणे आढळल्याचे निरीक्षण आहे. “
“ज्यांना बराच काळ कोविड विषाणूचा संसर्ग झाला होता, असे किंवा जे या विषाणूचे अधिक काळ वाहक होते, अशा रुग्णांकडून सातत्याने अशा तक्रारी येत आहेत, की त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना अद्याप निरोगी वाटत नाही. तसेच, अशा रुग्णांना थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, अंगदुखी, डोकेदुखी, हृदयाचे असमतोल ठोके, छातीत दुखणे, डायरिया, रक्ताच्या गुठळ्या होणे, वास आणि चव घेण्याची शक्ति कमी होणे अशी काही लक्षणे असल्याची तक्रार अनेक रुग्णांनी केली आहे.” असे, डॉ मॅथ्यू वर्गीस यांनी सांगितले.
अशा रुग्णांना केवळ शारीरिकच नाही, तर ‘दीर्घकालीन कोविड’ असलेल्याना मानसिक परिणामही जाणवत आहे, असे डॉ मॅथ्यू वर्गीस यांनी सांगितले. यात, अस्वस्थपणा, निराश वाटणे, विस्मृती अशी लक्षणे आहेत, मात्र विस्मृती म्हणजे, अल्झायमर्स सारखा आजार नव्हे, तर ‘दीर्घकालीन कोविड’ असलेल्या शरीरातील अॅस्ट्रोसाइट्स (मज्जासंस्थेशी संबंधित नसलेल्या पेशी) पेशींच्या नुकसानाचा परिणाम आहे.
डॉ वर्गीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अशाप्रकारचा दीर्घकालीन कोविड केवळ ज्येष्ठ नागरिकांना होत असे. मात्र आता सर्व वयोगटातील रुग्णांमध्ये तीच लक्षणे आढळत आहेत. कावासाकी आजार किंवा रक्तामध्ये गुठळ्या होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक आहे. मात्र, मुलांना त्यांच्या मानसिक आरोग्याविषयी सांगता येत नसल्याने, त्यांच्यावर काही मानसिक परिणाम होत आहे का हे शोधणे जरा अवघड असते .
ही सगळी लक्षणे कोविडमुळेच आहेत, की इतर कशामुळे, हे निश्चित तपासण्यासाठी, डॉक्टर्स रुग्णांमध्ये कोविड संसर्ग होण्यापूर्वी ही लक्षणे, सौम्य स्वरूपात का होईना, पण होती का ते तपासतात, ज्यावरुन त्यांना याचा अंदाज बांधता येतो, असे डॉ वर्गीस यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्यविषयक सूचना
डॉ वर्गीस यांनी याविषयी जागृती करत, गंभीर स्वरूपाच्या कोविडमधून बरे झाल्यानंतर अशी लक्षणे असणाऱ्या सर्वांनी ताबडतोब त्यावर उपचार सुरु करावेत, असा सल्ला दिला आहे. मात्र हे उपचार रुग्ण बरा झाल्यानंतर,तीन महिन्यांनी करावेत असेही त्यांनी सांगितले. कोविड मधून बऱ्या झालेल्या रुग्णाने, लगेचच व्यायाम सुरु केल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या काही केसेस आढळल्याचे त्यांनी सांगितले.
‘दीर्घकालीन कोविड’ नंतर, सांध्यामध्ये सूज किंवा वेदना हे ही एक महत्वाचे लक्षण अनेक रुग्णांना जाणवत आहे. कोविड झाल्यावर आपल्या शरीरात तयार होणारी प्रतिजैविके आपल्या इतर चांगल्या पेशींवरही हल्ला करतात, त्यामुळे हे होते, असे वर्गीस यांनी सांगितले. मात्र, अनेकजण सांधेदुखीपेक्षाही, अंगदुखी होत असल्याची तक्रार करतात. कोविडवर उपचार करतांना स्टेरॉईडचा अधिक वापर झाल्यास, त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो. अव्हास्क्यूलर न्यूरॉसिस, या आजारामुळे, शरीरातून हाडांना होणारा रक्तपुरवठा तात्पुरता किंवा कायमस्वरुपी बंद होऊ शकतो. उपचारादरम्यान स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे देखील, हा आजार होत असल्याचे लक्षात आले आहे.
आपण आपली हाडे मजबूत कशी ठेवू शकतो याविषयी डॉ वर्गीस यांनी माहिती दिली. व्यक्तीच्या वयाच्या 25 वर्षांपर्यंत, त्याच्या शारीरिक हालचाली, व्यायाम, यावर त्याच्या हाडांची ताकद अवलंबून असते, असे त्यांनी सांगितले. त्यासाठीच तरुणांनी शारीरिक व्यायाम, खेळ अशा गोष्टी कराव्यात, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी, रोज किमान अर्धा तास चालणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते पुढे म्हणाले.
आहाराविषयी बोलतांना ते म्हणाले, की आपल्याला आहारात, प्रथिने, कॅल्शियम आणि ड जीवन सत्व युक्त आहार घ्यायला हवा, तसेच, दूध, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा यातून देखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. मात्र, ड जीवनसत्व खातांना एक काळजी घ्यायला हवी. हे मेद-विरघळवणारे जीवनसत्व असून ते आपल्या शरीरात साचून राहू शकते. ज्याचे इतर काही दुष्परिणाम होऊ शकतात. सूर्यप्रकाशही ड जीवनसत्व मिळवण्याचा उत्तम स्त्रोत आहे. मात्र, आज प्रदूषणामुळे हा सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत योग्यप्रकारे पोचू शकत नाही.
केंद्र सरकारकया विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झालेली डॉ वर्गीस यांची पूर्ण मुलाखत बघण्यासाठी इथे क्लिक करा.
कोविड नंतरची लक्षणे, त्यांचा सामना कसं करायचा आणि कोविडमधून बरे होण्यासाठी पोषक आहार कसा फायदेशीर ठरतो, हे बघण्यासाठी इथे क्लिक करा.