People’s leader late D. B. Patil’s struggle story will be realized in Panvel through a museum
लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांची संघर्षगाथा संग्रहालयाच्या माध्यमातून पनवेलमध्ये साकारणार
रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी पनवेल येथे लवकरच स्किल सेंटर उभे करणार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
पालकमंत्री उदय सामंत यांनीही महारोजगार मेळाव्याला भेट देवून युवा वर्गाला दिल्या शुभेच्छा
अलिबाग : प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांच्या नावाने पनवेलमध्ये म्युझियम साकारण्यात येईल, त्यासाठी पर्यटन विभागातर्फे पाच कोटी रुपये तरतूदीची तसेच येथील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी लवकरच एक चांगले स्किल सेंटर उभे करण्याची घोषणा राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज पनवेल येथे केली.
भूमीपुत्रांचे दैवत स्व.दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग, लोकनेते दि. बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार, पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विजय टिकोले, सुप्रिया ठाकूर, पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, अरुणशेठ भगत, उद्योजक जे. एम. म्हात्रे, गुलाब वझे, दीपक म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनीही या महारोजगार मेळाव्याला भेट देऊन उपस्थित युवा वर्गाला शुभेच्छा दिल्या.
मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की, लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्थानिक जनतेसाठी व महाराष्ट्रासाठी फार मोठे योगदान आहे. ते लक्षात घेता त्यांची संघर्षगाथा संग्रहालयाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून विविध नोकर्या उपलब्ध होणार आहेत. त्या मिळणे स्थानिकांचा हक्क आहे. त्यासाठी येथे 30 दिवसांच्या आत स्कील सेंटर उभे करू, असे सांगून राज्यात या शासनाच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रात सातशेपेक्षा जास्त रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. आज पनवेलमध्येही रोजगार मेळावा होत आहे. येथे बेरोजगार उमेदवारांना नोकरी- रोजगारासाठी उपस्थित अधिकारी सर्व माहिती देतील. शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला नोकरी करायची असेल किंवा स्वयंरोजगारासाठी कर्ज हवे असेल तर आमची जबाबदारी आहे की, त्यासाठी योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला ते मिळवून देणे. या मेळाव्यानंतरही तुम्हाला जे काही सहकार्य हवे असेल ते आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी करतीलच.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी लढा उभारण्यात आला होता. त्या अंतर्गत झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी लोकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत मीही आहे. हे गुन्हे मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.
यावेळी सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान कुणीही विसरू शकत नाही. त्यांनी शेतकरी, प्रकल्पग्रस्त, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले. जनतेचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत, त्यांची प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांनी वेळोवेळी संघर्ष केला. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, याकरिता येथील भूमीपुत्रांनी ऐतिहासिक लढा दिला आणि त्याला यश मिळाले असून या विमानतळाला राज्य सरकारने ‘दिबां’चे नाव देण्याचे जाहीरही केले आहे. आता यासाठी समितीमार्फत पुढील पाठपुरावा केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे.
कृती समितीचे सल्लागार व माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार महेश बालदी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून महारोजगर मेळाव्यानिमित्त उपस्थित तरुणांना शुभेच्छा दिल्या.
या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध 38 कंपन्यांकडून 2 हजार 399 रिक्त पदांसाठी उमेदवारांची मागणी नोंदविण्यात आली होती. तर या मेळाव्यास 651 बेरोजगार युवकांनी नावे नोंदविली होती. मुलाखत 1 हजार 124 जणांनी दिली तर एकूण 272 जणांची प्राथमिक निवड करण्यात आली, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी दिली.
कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिराला भेट देत ‘दिबां’ना अभिवादन केले.
शेवटी जे. डी. तांडेल यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमानंतर लोकनेते दि.बा.पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि अन्य मान्यवरांनी लोकनेते स्व. दि.बा.पाटील यांच्या पनवेल येथील घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com