विघ्नहर्ता देवस्थान रस्त्यासाठी ११ लाखांचा निधी-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे
पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे विघ्नहर्ता गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रवेशद्वार ते मंदिर या रस्त्याच्या कामासाठी स्वत:च्या आमदार निधीतून 11 लाख रुपये देण्याचे जाहीर केले.
देवस्थानच्यावतीने डॉ.गोऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, जुन्नर पंचायत समिती सभापती विशाल तांबे, तहसिलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी आदी उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले, पर्यटन विभागाच्या माध्यमातून अष्टविनायक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला असून पर्यटनाच्यादृष्टीने विकासकामांना गती देण्यात येत आहे. ओझर प्रवेशद्वार ते मंदिर असा आठशे मिटरचा रस्ता वर्षभरात काँक्रेटिकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
अष्टविनायक विकास प्रकल्पांतर्गत मंजूर निधीची पूर्ततादेखील लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगून; प्रवेशद्वार ते मंदिर या रस्त्याच्या कामासाठी आमदार निधीतून 11 लाख रुपये देण्याचे जाहीर केले. देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात असेदेखील त्यांनी सांगितले.
यावेळी ओझर गावच्या सरपंच मथुरा कवडे, ओझर नं. 2 च्या सरपंच तारामती कर्डक, देवस्थानचे खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त बी. व्ही. मांडे, आनंदराव मांडे, मंगेश मांडे, गणपत कवडे, विजय घेगडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.