Organizing a special lecture on G-20 for students and citizens
विद्यार्थी व नागरिकांसाठी जी-२० विषयी विशेष व्याख्यानाचे आयोजन
विद्यापीठात जी-२० परिषदेची जय्यत तयारी सुरू..!!
पुणे : भारतात जी-२० या विविध देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पाडणाऱ्या परिषदेतील कार्यक्रमासाठी अन्य स्थळांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे स्थळ देखील निश्चित करण्यात आले आहे.
१६ जानेवारी रोजी या परिषदेतील एक कार्यक्रम विद्यापीठाच्या प्रांगणात होणार असून त्यासाठीची जय्यत तयारी विद्यापीठाकडून सुरू करण्यात आली आहे. जी-२० ही परिषद काय आहे, कशासाठी आहे याबाबत माहिती देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विशेष माहितीपर व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
विद्यापीठात दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी जी २० परिषदे अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. विद्यापीठाच्या दीडशे वर्षे जुन्या ऐतिहासिक वास्तूत हा जागतिक दर्जाचा कार्यक्रम होत असून ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे.
– डॉ.कारभारी काळे, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
याबाबत माहिती देताना कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पुण्याचे शिक्षणातील वैभव आहे. या वास्तूत जी-२० परिषदेतील काही कार्यक्रम होणार ही विद्यापीठाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. या परिषदेची पूर्वतयारी म्हणून विद्यापीठाकडून अनेक कामे हाती घेण्यात आली आहे. अनेक डागडुजीची कामे, परिसर स्वच्छता, सुरक्षा आदींच्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यासाठी विद्यापीठातील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी महाराष्ट्र शासनाच्या साहाय्याने काम करत आहे.
पुणे हे सांस्कृतिक शहर आहे त्यासोबतच विद्यापीठाची जगात ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ अशी ओळख देखील आहे. जी-२० परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक घडामोडी जाणून घेण्याची ही संधी निर्माण झाली आहे.
डॉ.संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे जी -२० परिषद ही नेमकी काय आहे, यात कोण सहभागी होणार आहे, या परिषदेच्या माध्यमातून काय साध्य होणार आहे, याचा इतिहास काय सांगतो अशा सर्व प्रश्नांची उत्तरे ही परिषद सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना तसेच सामान्यांना मिळणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून दिनांक १३ व १४ जानेवारी रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. हे व्याख्यान विद्यापीठाशी संलग्न सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने ऐकता येणार आहे. विद्यार्थ्यांसोबत सामान्य नागरिकांना देखील या व्याख्यानाच्या माध्यमातून याविषयी जाणून घेता येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल असेही डॉ.प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com