Nutrition and interests should be considered while feeding students
विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि आवड लक्षात घ्यावी
– शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि विद्यार्थ्यांची आवड या दोन्ही बाबी प्राधान्याने विचारात घ्याव्यात, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक मंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. समितीचे सदस्य प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, आघारकर संशोधन संस्थेचे प्रसाद कुलकर्णी, पोषण तज्ज्ञ डॉ. अर्चना ठोंबरे यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव इम्तियाज काझी, अवर सचिव प्रमोद पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त केंद्र व राज्य शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. विभागाने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, ज्यामुळे विद्यार्थ्यांना तृणधान्य पिकांची पौष्टिकता लक्षात येईल. पोषण हा विद्यार्थ्यांच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी आहारामध्ये तृणधान्यांचा (मिलेटस्) वापर करावा. हे करीत असताना विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन त्याअनुषंगाने दररोज खिचडीसारखे पदार्थ देण्याऐवजी त्यात विविधता आणण्याची सूचनाही त्यांनी केली.
यावेळी उपस्थित सदस्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले पोषण, त्यांची आवड या अनुषंगाने उपयुक्त सूचना केल्या.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि आवड लक्षात घ्यावी”