Plan for exams with students at the centre – Minister of State for School Education Omprakash alias Bachchubhau Kadu.
विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून परीक्षेचे नियोजन करा – शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू.
शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांकडून परीक्षांचा आढावा.
अमरावती : दहावी तसेच बारावी या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा असतात. गत दोन वर्षापासून कोविड संक्रमणामुळे शिक्षण व परीक्षा पध्दतीमध्ये बदल झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण पध्दत आणि प्रत्यक्ष वर्गातील शिकवणी यामध्ये फरक आहे. इंटरनेट अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थी बरेचदा ऑनलाईन शिकवणीपासून वंचित राहतात. या बाबींचाही सर्वांगिण विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून परीक्षा पध्दतीचे नियोजन व्हावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री श्री. कडू यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या समवेत शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी शासकीय विश्रामगृह येथून दूरदृष्य प्रणालीव्दारे दहावी-बारावीच्या परीक्षांच्या नियोजनाबाबत आज आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आभासी बैठकीमध्ये दहावी-बारावीच्या होवू घातलेल्या परीक्षा, वेळापत्रक, अभ्यासक्रम आदींबाबत चर्चा करण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागाचे संबंधित पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. लिखाणाच्या सवयी अभावी विद्यार्थी परीक्षेत कमी पडू नये यासाठी या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अर्ध्या तासाचा वाढीव वेळ मिळावा. सध्या परिवहन महामंडळाच्या संपामुळे ग्रामीण भागातील एसटी बसेस नियमित सुरु नाहीत. बरेच विद्यार्थी गावात शाळा नसल्यामुळे शिक्षणासाठी इतर गावात जातात. असे विद्यार्थी वाहतूकीच्या सोयी अभावी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी ‘शाळा तेथे केंद्र’ देण्यात यावे. अथवा अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करता येईल का, याबाबींचाही विचार करण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिले.
परीक्षा प्रक्रिया राबवितांना सीबीएससी बोर्ड प्रमाणे परीक्षा घेता येतील का, याचेही नियोजन करण्यात यावे. तसेच ऑनलाईन अभ्यासक्रम किती टक्के पूर्ण करण्यात आला आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल त्वरीत सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.