विविध संस्थांच्या समन्वयाने आर्थिक प्रशिक्षण द्यावे -उपमुख्यमंत्री अजित पवार.
महिला आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत आढावा बैठक.
आर्थिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत बचत गटातील महिला, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांना संबंधित विविध यंत्रणांच्या समन्वयाने प्रशिक्षण द्यावे , असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर , अग्रणी बँकेचे श्रीकांत कारेगावकर आदी उपस्थित होते.
प्रशिक्षण साहित्यात सोप्या भाषेत सर्वसमावेशक माहितीचा समावेश करावा असेही श्री. पवार म्हणाले. प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण साहित्य आणि पुस्तिका तयार करण्यात येणार असून महिला, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांना मंडळ निहाय प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.