वीरांगना: महिलांचे रक्षण करणा-या महिलांच्या शौर्य, पराक्रम आणि धैर्याची कथा.
52 व्या इफ्फीमध्ये आसामी माहितीपट ‘वीरांगना‘ चे प्रदर्शन.
‘‘वीरांगना याचा अर्थ आहे अतिशय शूर, पराक्रमी महिला. अशी महिला आपल्या हक्कांसाठी समोरच्या व्यक्तीबरोबर मोठ्या धैर्याने लढा देते. एक कणखर, सशक्त महिला केवळ आपल्या स्वतःचे रक्षण करतात असे नाही तर, इतरांचेही रक्षण करतात’’, असे मत ‘वीरांगना’ या आसामी माहितीपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते किशोर कलिता यांनी आज व्यक्त केले. गोव्यात 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच ‘इफ्फी’मध्ये आज त्यांच्या माहितीपटाच्या प्रदर्शनाच्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
इंडियन पॅनोरमाच्या नॉन-फीचर फिल्म विभागात ‘वीरांगना’ची निवड झाली आहे. वर्ष 2012 मध्ये आसाम पोलिस खात्यामध्ये महिला कमांडो दल- वीरांगनाची स्थापना करण्यात आली. देशात महिलांचे कमांडो दल पहिल्यांदाच तयार करण्यात आले होते.
‘वीरांगना’ या 21 मिनिटांच्या माहितीपटात आपल्याला महिला कमांडो समाजातली वाढती गुन्हेगारी, विघातक कृत्ये रोखण्यासाठी कशा प्रकारे आणि किती आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जातात, हे दिग्दर्शकाने दाखवले आहे. कमांडो दलाच्या सर्व कामांमध्ये, उपक्रमांमध्ये वीरांगना कशा सहभागी होतात, याचे दर्शन या माहितीपटात घडवले आहे.
वीरांगना दलाच्या गणवेशातल्या कमांडोज् ज्यावेळी रात्री-बेरात्री, मध्यरात्री रस्त्यावर गस्त घालत असायच्या, त्यावेळी सर्वसामान्य महिला आपल्या घराच्या बाहेर येऊन त्यांना पहायच्या. गणवेशातल्या वीरांगना पाहिल्यावर या सर्वसाधारण महिलांनाही सुरक्षित वाटायचे. हाच धागा पकडून त्या संकल्पनेवर वीरांगनाची कथा पडद्यावर मांडली आहे, असे या माहितीपटाचे दिग्दर्शक कलिता यांनी सांगितले.
‘‘चित्रीकरण त्यानंतर फेर-चित्रीकरण, पटकथा लिहिणे आणि केलेले बदल पुन्हा एकदा लिहिणे यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला. मात्र आम्हाला अपेक्षेपेक्षाही चांगले परिणाम मिळाले ’’, असे यावेळी या माहितीपटाचे लेखक आणि प्रख्यात चित्रपट समीक्षक उत्पल दत्त यांनी सांगितले.
वीरांगना या माहितीपट विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तसेच कोचिन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये- 2021 मध्ये सर्वोत्कृष्ठ माहितीपट म्हणून ‘वीरांगना’ला पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
चित्रपट समीक्षक आणि वीरांगनाचे पटकथा लेखक उत्पल दत्ता यांनीही यावेळी प्रसार माध्यमांबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांच्या ‘फिल्म अॅप्रिसिएशन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.