Medical Education Minister Amit Deshmukh visits Stemz Onco Diagnostic Lab.
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची स्टेम्झ ऑन्को डायग्नोस्टिक लॅबला भेट.
मुंबई : वांद्रे येथील स्टेम्झ ऑन्को डायग्नोस्टिक लॅबला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान या लॅबचे दैनंदिन काम कसे चालते याबाबतची पाहणी त्यांनी केली.
स्टेम्झ ऑन्को डायग्नोस्टिक लॅबमध्ये कतार येथे कामासाठी, व्यवसायासाठी जाणाऱ्या नागरिकांची आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी केली जाते. या पाहणीदरम्यान या लॅबचे संचालक अमन बक्षी यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांना या लॅबचे काम, या लॅबची उपयुक्तता, येथे दैनंदिन करण्यात येणाऱ्या तपासण्या, कतार येथे जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तपासण्या, आरटीपीसीआर चाचण्या कशा करण्यात येतात, या चाचण्या करीत असताना स्वच्छतेचे आणि सुरक्षिततेचे नियम कसे पाळले जातात याबाबतची माहिती दिली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाबरोबर येणाऱ्या काळात स्टेम्झ ऑन्को इंडिया कंपनीने काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले.
कॅन्सर केअरबाबत उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत कंपनी आग्रही आहे. याशिवाय राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अद्ययावत उपकरणे, शस्त्रक्रियेदरम्यान आवश्यक असणारी यंत्रसामुग्री, अद्ययावत प्रयोगशाळांचे जाळे उभारण्यासाठीही कंपनी पुढाकार घेईल असे यावेळी लॅबचे संचालक श्री. बक्षी यांनी सांगितले.