The state government has taken serious notice of the threat to Sharad Pawar
शरद पवार यांना आलेल्या धमकीची राज्य सरकारकडून गंभीर दखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेल्या धमकीची राज्य सरकारकडून गंभीर दखल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यक असेल तर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्याचं शिंदे यांनी टि्वद्वारे सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून हा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी या टि्वटमध्ये केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचं उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं कारस्थान हाणून पाडलं जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पोलिस आयुक्त – गृहमंत्री भेट
खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकीची तक्रार पोलिस आयुक्तांकडे केल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून तात्काळ कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान अशा धमक्या खपवून घेणार नसल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
सुरक्षेत वाढ
या धमकी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ‘तुमचा दाभोलकर करू’ अशी धमकी दिल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com