Department of School Education and Literacy to celebrate iconic week from 17th January – 21st January 2022.
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग 17 ते 21 जानेवारी 2022 या कालावधीत विशेष सप्ताह करणार साजरा.
नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग 17 जानेवारी ते 21 जानेवारी 2022 या कालावधीत आयकॉनिक- विशेष सप्ताह साजरा करणार आहे.
या विशेष सप्ताहाचा एक भाग म्हणून, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग विविध कार्यक्रमांची मालिका आयोजित करणार आहे. यामध्ये ‘खेळणी आणि खेळण्यासाठी खेळ, तयार करा आणि शिका’ या विषयावरील दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहोदय शाळा संकुलांची 27 वी राष्ट्रीय वार्षिक परिषद होणार आहे आणि सर्वसमावेशक शिक्षणावरील वेबिनारचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
अटल नवोन्मेष अभियानाच्या (एआयएम) सहकार्याने समावेशक शिक्षणावरील वेबिनार 17.01.2022 रोजी आभासी पद्धतीने आणि प्रत्यक्षरित्या आयोजित केले जाईल. ‘विशेष लक्ष देण्याची गरज असलेल्या मुलांना केंद्रस्थानी ठेवून ‘एड टेक स्टार्ट अप्स’ ही या वेबिनारची संकल्पना आहे. शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्याध्यापक राज्य आयई समन्वयक, पालक आणि इतर हितसंबंधित या कार्यक्रमात सहभागी होतील. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी उपलब्ध असलेले तंत्रज्ञान आणि सहाय्यकारी उपकरणांबद्दल पालक आणि शिक्षकांना जागरूक करणे हा या वेबिनारचा मुख्य उद्देश आहे.
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनें सीबीएसईच्या सहोदय शाळा संकुलांच्या 27 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून ‘पुनर्नवा – भारताचा पुनःशोध @75’ या संकल्पनेवर आधारित असलेली ही राष्ट्रीय परिषद सहोदय शाळा संकुल, ग्वाल्हेरच्या सहकार्याने 17 आणि 18 जानेवारी 2022 रोजी आभासी आणि प्रत्यक्ष अशा मिश्र पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. शाश्वत भविष्यासाठी सह-निर्मिती आणि योगदान देण्यासाठी सहभागींना कार्यरत ठेवणे हा या परिषदेचा उद्देश आहे. सीबीएसई संलग्न शाळांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने मंडळाने सुरू केलेली नवीन धोरणे आणि नाविन्यपूर्ण पद्धती समजून घेण्यास सक्षम करणे हे देखील या परिषदेचे उद्दिष्ट आहे.