तंत्रज्ञानाने सक्षम पिढी घडविण्यासाठी काम करा-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत.
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची किमया ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. शिक्षणसंस्थांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाने सक्षम पिढी घडविण्यासाठी काम करावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात आयोजित शासकीय अभियांत्रिकी पदविका संस्थांच्या प्रायार्य व सहसंचालकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक अभय वाघ, उपसचिव सतिष तिडके, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे (एमएसबीटीई) संचालक डॉ.विनोद मोहितकर, सहसंचालक प्रमोद नाईक, दत्तात्रय जाधव उपस्थित होते.
श्री.सामंत म्हणाले, तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेणारी पिढी घडविण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयात सर्व सोईसुविधा मिळाल्या पाहीजेत, यासाठीचा आराखडा तयार करावा. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ आणि आवश्यक सुविधांनीयुक्त राहील यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थी आणि पालक आकर्षित होतील असा परिसर असाव. त्यासोबतच नवे ज्ञान आणि नव्या कल्पनादेखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्राचार्यांच्या नियोजनाने ऑक्सीजन ऑडीटचे अत्यंत चांगले काम केले आहे. त्यामुळे कोरोना कालावधीत ऑक्सीजनचे नियोजन सुलभ झाल्याचा उल्लेख करून मंत्री सामंत म्हणाले, महाविद्यालयाचा परिसर सुसज्ज असला पाहीजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला शासनाचे सर्वाधिक प्राधान्य आहे. विद्यार्थी व पालकांना बरोबर घेत शैक्षणिक वातावरण अधीक चांगले करण्यासाठी प्राचार्यांनी भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. कार्यशाळेत भविष्यातील शैक्षणिक प्रगती कशी असावी, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयावर मंथन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला असल्याचेही मंत्री सामंत म्हणाले.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक अभय वाघ यांनी प्रास्ताविक करताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे रोजगारावर आधारीत अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यातील अभियांत्रिकी पदविका संस्थांचे प्राचार्य, सहसंचालक तसेच ‘एमएसबीटीई’चे अधिकारी उपस्थित होते.