शिरुर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.

शिरुर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार.

Dy. CM.Ajit-Pawar
File Photo

शिरुर परिसराच्या विकास कामांसाठी येत्या मार्च अखेरपर्यंत, एकूण २५ कोटी रुपयांची तरतूद करणार असून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

शिरुर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे,आमदार अशोक पवार, नगराध्यक्ष वैशाली वाखारे आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले,नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत शिरुरच्या वैभवात भर घालणारी वास्तू आहे. या इमारतीमधून कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ न देता लोकाभिमुख, पारदर्शक कामे व्हावीत. प्रत्येक निर्णय शहराचा विकासाला चालना देणारा असला पाहिजे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांना सोबत घेवून शिरुरनगरीचा विकास करावा.

नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या लक्षात घेवूनच प्रशासनाला सहकार्य करायला हवे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्याबाबत नागरीकांच्या हरकती असल्यास त्यावर योग्यप्रकारे विचार करण्यात येईल. पुणे ते शिरुर रस्त्याचे दुमजली कामासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. वारीमार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावून विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ.कोल्हे म्हणाले, शिरुर परिसर हे मराठवाड्याच्या नागरिकांकरीता पुणे व मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून भविष्यात ओळखले जाईल अशी विकासकामे करण्याचा प्रयत्न आहे.

आमदार श्री.पवार म्हणाले, शिरुर परिसरातील पायाभूत विकास करण्यासाठी वेळोवेळी निधी प्राप्त झालेला आहे. यापुढेही विविध विकासकामे करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते नगर परिषद आवारात ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी नूतन इमारतीची पाहणी केली.

कार्यक्रमाला माजी आमदार पोपटराव गावडे व रमेश थोरात, उपनगराध्यक्ष प्रकाश धारीवाल, मुख्याधिकारी अँड प्रसाद बोरकर, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेचे आजी माजी पदाधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *