Shishir Shinde and Manisha Kayande leave the Uddhav Thackeray group
शिशिर शिंदे आणि मनिषा कायंदे यांची उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी
ठाकरे गटाला मोठा धक्का
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी काल आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. आपली पक्षात उपनेतेपदावर नियुक्ती झाल्यानंतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती असं त्यांनी पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे.
ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे, ठाकरे गटाच्या विधानपरिषदेचे आमदार मनीषा कायंदे, तर चुनाभट्टी येथील नगरसेवक तांडेल दापंत्यांने शिवसेनेला (ठाकरे गटाला) सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जाते आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे व शिंदे गटाचे कार्यक्रम होत आहे. या वर्धापनदिनी ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे काम शिंदे गटाने केले, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
चुनाभट्टी येथील नगरसेवक तांडेल पती पत्नीनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिले. ठाकरे गटात आपल्याला डावलण्यात आले, असा आरोप तांडेल दांपत्यांने केला आहे. ते आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
“आयुष्यातली चार वर्षे वाया गेली” म्हणत शिशिर शिंदेंचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
ठाकरे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी आयुष्यातली चार वर्षे वाया गेली म्हणत उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. शिशिर शिंदे यांनी राजीनाम्याचे पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. राजीनामा देताना शिंदेंनी खंत व्यक्त केली आहे. शिंदेंनी म्हटलं आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय, पण उद्धव ठाकरे भेटत नाहीये. अनेक वेळा भेटीसाठी प्रयत्न केले, पण पक्षप्रमुखांची भेटतच नव्हते. शिवसेनेत (ठाकरे गटात) मला मनासारखं काम मिळत नाही, म्हणून मी राजीनामा देत असल्याची खंत शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. शिशिर शिंदे यांची 19 जून 2018 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत घरवापसी झाली होती.
दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. परंतु पक्षप्रवेशापूर्वीच ठाकरे गटाकडून मनीषा कायंदे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मनीषा कायंदे यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी माहिती दिली आहे.
मनीषा कायंदे यांच्यावर लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले आहेत. त्या लहानपणी वडिलांबरोबर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे ऐकायला जात असे. वडिलांची ग्रामीण भागात नेत्रं शिबिरे भरायची त्यावेळी देखील त्या तिथे त्यांना मदत म्हणून जायच्या. त्यामुळे त्यांनी ग्रामीण महाराष्ट्र जवळून पाहिला असून त्याबाबत त्यांना अधिक माहिती आहे.
मनीषा कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणाला सुरुवात केली. तब्बल 25 ते 30 वर्षे त्या भाजप पक्षात कार्यरत होत्या. या काळात त्यांनी जयवंतीबेन मेहता, सुषमा स्वराज, राजमाता विजयाराजे शिंदे यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळाली. 1997मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. परंतु शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्याने त्यांचा निसटता पराभव झाला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com