More than 40 food items banned in Shri Amarnath Ji Yatra
श्री अमरनाथ जी यात्रेत ४० हून अधिक खाद्यपदार्थांवर बंदी
नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने सुरू
जम्मू आणि काश्मीर : येत्या १ जुलैपासून या वर्षीची अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. श्री अमरनाथजींच्या ३ हजार आठशे ऐंशी मीटर उंच पवित्र गुहेची ६२ दिवसांची यात्रा दोन मार्गावरून सुरू होणार आहे. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातला पहलगाममधील ४८ किमीचा नुनवान मार्ग आणि दुसरा मध्य काश्मीरमधल्या गंदरबल जिल्ह्यातला १४ किलोमीटरचा बालटाल मार्ग हे दोन मार्ग असतील.
श्री अमरनाथजी देवस्थान महामंडळानं जम्मू आणि काश्मीरमध्ये १ जुलैपासून सुरू होणाऱ्या ६२ दिवसांच्या आगामी वार्षिक श्री अमरनाथ यात्रेत ४० हून अधिक खाद्यपदार्थांवर बंदी घातली आहे.
बंदी असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये पेय, तळलेले आणि फास्ट फूड पदार्थांचा समावेश आहे. भाविकांचे आरोग्य लक्षात घेऊन बोर्डनं धान्य, कडधान्यं, हिरव्या भाज्या आणि तांदळाच्या काही पदार्थांसह कोशिंबीर या आरोग्यदायी पर्यायांची शिफारस केली आहे.
यात्रेकरूंना हायपोथर्मिया टाळण्यासाठी काही विशेष सूचना दिल्या आहेत, ज्यात भरपूर द्रवपदार्थ असलेले निरोगी आहार, उबदार पेयं आणि उर्जेसाठी नियमित जेवण यांचा समावेश आहे जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण होईल.
भक्तांना अल्कोहोल, कॅफिन आणि धूम्रपान टाळण्याचा सल्ला दिला आहे, कारण या सर्वांमुळे शरीरातील उष्णता कमी होण्याचं प्रमाण वाढत . शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी महामंडळानं यात्रेकरूंना दिवसातून किमान ५ किलोमीटर चालण्याचा सल्ला दिला आहे.
नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने सुरू
पवित्र तीर्थयात्रा या वर्षी 1 जुलै रोजी सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी संपेल. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल या दोन्ही मार्गांसाठी नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रेसाठी अधिकृत वेबसाइट www.jksasb.nic.in वर ऑनलाइन नोंदणी करू शकतात
अमरनाथ यात्रेकरूंच्या नोंदणी प्रक्रियेसाठी देशभरातील सुमारे 542 बँक शाखा नियुक्त केल्या आहेत. यामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या 316 शाखा, जम्मू आणि काश्मीरमधील 90 शाखा, येस बँकेच्या 37 शाखा आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 99 शाखांचा समावेश आहे.
यावर्षी, यात्रेकरूंची आधार-आधारित नोंदणी केली जाईल जिथे नोंदणीसाठी यात्रेकरूंचा अंगठा स्कॅन केला जाईल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com