संपात सहभागी एसटी कामगारांच्या बडतर्फीच्या आदेशाला, स्थगितीची मागणी करणारी याचिका; कामगार न्यायालयानं फेटाळली.
मुंबई : एसटीच्या संपात, सहभागी झालेल्या कामगारांनी, आपल्या बडतर्फीच्या आदेशाला स्थगिती द्यावी यासाठी दाखल केलेली याचिका, कामगार न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
लातूर आणि यवतमाळ विभागातल्या या कर्मचाऱ्यांविरोधात, कामावर गैरहजर राहणं, एसटीच्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणं, अन्य कर्मचाऱ्यांना संपासाठी प्रवृत्त करणं, एसटीची वाहतूक बंद करणं, आर्थिक नुकसान करणं, या कारणांसाठी महामंडळानं दोषारोप पत्र दाखल केलं होतं.
या कामगारांना राज्य परिवहन सेवेतून बडतर्फ का केलं जाऊ नये, अशी नोटीसही बजावली होती. त्याविरोधात कामगारांनी स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयानं कारवाईला स्थगिती द्यायला नकार दिला आहे. या निकालानंतर महामंडळानं संबंधित नऊ कामगारांना सेवेतून तत्काळ बडतर्फ केलं.