Inauguration of ‘Chala Boluya’ board at Sambhaji Udyan
संभाजी उद्यान येथे ‘चला बोलूया’ फलकाचे उद्घाटन
पुणे : प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनानुसार संभाजी उद्यान येथे ‘चला बोलूया’ या वादपूर्व समुपदेशन केंद्र फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार जेष्ठ नागरिक तसेच जनसामान्यांपर्यंत या केंद्राची माहिती व्हावी आणि त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने महानगरपालिका विभागाच्या ६१ उद्यानांची निवड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आली आहे. त्यानुसार संभाजी उद्यान येथे २ फलक लावण्यात आले. या फलकांवर ‘चला बोलूया’ या वादपूर्व समुपदेशन केंद्राची माहिती देण्यात आली आहे.
‘चला बोलूया’ ही संकल्पना सर्वोच न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांची आहे. सन २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम पुणे जिल्ह्यामध्ये हे कार्यालय सुरु करण्यात आले. जिल्हा विधि सेवा प्राधिकर पुणे कार्यालयामार्फत हा उपक्रम कौंटुंबिक न्यायालयात येणाऱ्या दाव्याकरीता सुरु करण्यात आला आहे.
दाखल पूर्व दाव्यांमध्ये समुपदेशन करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रात पती-पत्नी मधील वाद पोटगी संबंधीचे वाद, मुलांच्या ताब्याचे वाद, मालमत्तेचे वाद या व्यतिरिक्त आई-वडील व मुलांमधील पोटगी किंवा सांभाळ करण्याबाबतचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. तडजोड न झाल्यास उभय पक्षकारांना विधि सेवा दिली जाते. गेल्यावर्षी ४३२ दाव्यांपैकी ४२२ दावे निकाली काढण्यात आले.
या उपक्रमामध्ये पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे, प्रमुख विधि सल्लागार निशा चव्हाण, मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
फलकाच्या माध्यमातून वादपूर्व समुपदेशन केंद्राची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे शक्य होईल अशी माहिती जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सचिव मंगल कश्यप यांनी दिली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com