संभाव्य कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता, नागरिकांना नियोजन करुन प्राधान्याने दुसरा डोस द्या-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना.
कोरोना विषाणुवर नियंत्रण मिळविण्याच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. संभाव्य कोरोनाची तिसऱ्या लाटेचा विचार करता पहिल्या डोस घेतलेल्या नागरिकांना नियोजन करुन प्राधान्याने दुसरा डोस द्या अशा सूचना गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी दिल्या. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पुणे विधानभवनाच्या सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
गृहमंत्री वळसे पाटील यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, ग्रामीण भागातील लोकसंख्या विचारात घेवून मनुष्यबळ वाढवा. औद्योगिक क्षेत्रावरील परिणाम लक्षात घेवून कामगार विभागाशी चर्चा करुन कामगारांना वेळेत लसीकरण करण्यासाठी कक्ष स्थापन करा. लसीकरणाच्या अनुषंगाने दिलेल्या शासनाच्या सूचनांचे पालन करा. कोरोनाच्या मृत्यूदर कमी करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना दिल्या.
विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची चर्चा करणार असल्याचे सांगून त्यासाठी प्रशासनाच्यावतीने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर सादर करा. कोरोनामुक्त गावांचा अनुभव इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा कोरोनामुक्त गावांचा अनुभव सर्वांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.याबाबतीतही सकारात्मक विचार करण्याच्या सूचना गोऱ्हे यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर, प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर, ऑक्सिजन प्लांटची सद्यस्थिती याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.