संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची संरक्षण संशोधन विकास संस्थेकडून यशस्वी चाचणी.
- वजनाने कमी, प्रक्षेपणानंतर दिशादर्शनाची गरज नसणारे, माणसाला वाहून नेता येईल असे, विशिष्ट दिशा दिलेले रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र
- सूक्ष्म स्वरूपातील अतिरक्त चित्रण करणारा शोधक
- लष्करास अतिशय उपयुक्त, आत्मनिर्भर भारत अभियानास मोठी चालना
आत्मनिर्भर भारत अभियानाला मोठी चालना देत आणि भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणखी वाढवत डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने, एमपीएटीजीएम म्हणजे ‘माणसाला वाहून नेता येईल असे व विशिष्ट दिशा दिलेले रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र’- या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन दाखवली. हे क्षेपणास्त्र संपूर्ण देशी बनावटीचे असून ते वजनाने हलके आहे, आणि ते फायर अँड फर्गेट प्रकारचे आहे- म्हणजेच प्रक्षेपणानंतर त्यास दिशादर्शनाची गरज लागत नाही. दि. 21 जुलै 2021 रोजी डीआरडीओने या क्षेपणास्त्राची घेतलेली प्रक्षेपण चाचणी यशस्वी ठरली. माणसाला वाहून नेता येईल अशा प्रक्षेपकाच्या मदतीने ही चाचणी घेतली गेली. त्या प्रक्षेपकातच थर्मल साईट म्हणजे तापमानानुसार वस्तू ‘बघून हेरण्याची’ यंत्रणा बसवण्यात आली आहे. चाचणीसाठी रणगाडासदृश लक्ष्य ठरविण्यात आले होते. क्षेपणास्त्राने थेट हल्ला चढवत लक्ष्याचा अचूक भेद केला. त्यामुळे किमान पल्ल्याच्या अटीचे समाधान होत असल्याचे या चाचणीतून निष्पन्न झाले आहे. या चाचणी मोहिमेसाठी आखलेली सर्व उद्दिष्टे सफल झाली. याच क्षेपणास्त्राची ‘कमाल पल्ल्यासाठी’ यापूर्वी घेतलेली चाचणी यशस्वी झाली आहे.
उड्डाणासाठी तयार झालेल्या अद्ययावत तंत्रांनी युक्त अशा सूक्ष्म आकाराच्या इन्फ्रारेड म्हणजे अतिरक्त चित्रण करणारा सीकर म्हणजे एक शोधकही या क्षेपणास्त्रामध्ये बसवण्यात आला आहे. या यशस्वी चाचणीमुळे आता, माणसाला वाहून नेता येईल अशा व विशिष्ट दिशा दिलेल्या अशा रणगाडाविरोधी तिसऱ्या पिढीच्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राचा विकास पूर्ततेच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओचे व संबंधित सर्वांचे अभिनंदन केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तथा डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.जी.सतीश रेड्डी यांनीही या यशाबद्दल पूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.