जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राची डीआरडीओ द्वारा यशस्वी चाचणी.
- नव्या जनरेशनचे जमिनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र.
- हवेतील हल्ल्यांना निष्प्रभ करण्यासाठी उच्च गतिमानता.
- भारतीय हवाई दलाच्या हवाई संरक्षण क्षमतांना पाठबळ.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था- डीआरडीओने आज म्हणजेच 21 जुलै, 2021 रोजी जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या नव्या जनरेशनच्या आकाश या क्षेपणास्त्राची ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरील एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) इथून यशस्वी चाचणी केली. आज दुपारी सुमारे 12.45 वाजता सर्व शस्त्रास्त्र प्रणाली- जसे की बहुपयोगी रडार, कमांड कंट्रोल अँड कम्युनिकेशन सिस्टीम आणि लाँचर सह ही चाचणी करण्यात आली.
ही क्षेपणास्त्र प्रणाली, हैदराबाद येथील संरक्षण, संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने डीआरडीओ सह विकसित केली आहे. आज झालेल्या चाचणीच्या वेळी, भारतीय हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते. फ्लाईट डेटा संकलित करण्यासाठी इलेक्ट्रो ऑप्टीकल ट्रॅकिंग सिस्टिम, रडार आणि टेलिमेट्री सारखे अनेक रेंज स्टेशन्स तैनात करण्यात आले होते. या संपूर्ण क्षेपणास्त्र प्रणालीची कामगिरी अत्यंत अचूक होती, असे संकलित झालेल्या डेटा वरुन स्पष्ट झाले आहे. या चाचणीदरम्यान, शत्रूच्यां हवेतील हल्ल्याला हवेतच निष्प्रभ करण्याची गतिमानता या क्षेपणास्त्रात असल्याचेही सिध्द झाले आहे.
भारतीय हवाई दलात समाविष्ट झाल्यावर, आकाश-एनजी प्रणाली भारतीय संरक्षण व्यवस्थेची क्षमता कित्येक पटीने वाढवणारी ठरेल. भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड आणि भारत डायनामिक्स लिमिटेड या उत्पादक संस्थांही या चाचणीत सहभागी झाल्या होत्या.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चाचणीबद्दल डीआरडीओ सह इतर सर्व संस्थांचे अभिनंदन केले आहे. हे क्षेपणास्त्र हवाई दलाला अधिक सक्षम करेल, असे संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.