Agreement in the all-party meeting on the smooth functioning of Parliament.
संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्यावर सर्वपक्षीय बैठकीत सहमती.
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
सुमारे २५ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सहकार्य करण्याबाबत सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर, तसंच अर्थसंल्पावर लोकसभेत १२ तास चर्चा होणार आहे.
सदस्यांनी या चर्चेत सहभागी व्हावं, असं ते म्हणाले. राज्यसभेतल्या चर्चेचा कालावधी कामकाज सल्लागार समितीच्य़ा बैठकीनंतर ठरवला जाईल. या अधिवेशनाचं दुसरं सत्र १४ मार्चला सुरु होणार आहे. त्यात इतर विषयांवर चर्चा होईल, असंही त्यांनी सांगितलं. पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चर्चा घेण्याच्या विरोधकांच्या मागणीबद्दल ते म्हणाले की, याबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल असल्यानं हा प्रश्न न्यायालयाच्या अधीन आहे.
राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनीही आज सर्व पक्षाच्या नेत्यांची आभासी पद्धतीनं बैठक घेतली आणि वेळापत्रकाची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना दिली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. यानंतर वार्ताहरांशी बोलताना बिर्ला म्हणाले, लोकसभेचं कामकाज सुरळीत चालू देण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन सर्वपक्षीय नेत्यांनी दिलं आहे.