सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा गावांचे भविष्य बदलेल.

सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा गावांचे भविष्य बदलेल- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेने गावागावातल्या माणसांची मने जोडली असून जोडलेल्या मनांना ज्ञानाच्या माध्यमातून समृद्ध करण्याचे काम समृद्ध गाव स्पर्धा करत आहेत. सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा गावांचे भविष्य बदलेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले.

पुरंदर तालुक्यातील सत्यमेव जयते समृद्ध गाव मिनी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात यशस्वी काम करणाऱ्या गावांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, पानी फाउंडेशनचे डॉ.अविनाश पोळ, नामदेव ननावरे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमुळे अनेक गावे पाणीदार झाली आहेत. सातारा आणि यवतमाळ जिल्ह्यात काम करत असताना याचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला आहे. पाणीदार झालेल्या गावांसाठीच पानी फाउंडेशनने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेतदेखील पुरंदर तालुक्यातील सर्व गावे उत्तम काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गाव समृद्ध करण्यासाठी प्रशासनाचे सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर स्पर्धेचा घटक म्हणून कायमसोबत आहे. येणाऱ्या काळात पानी फाउंडेशनच्या होणाऱ्या प्रत्येक उपक्रमात आवर्जून सहभागी होणार असल्याचे मत त्यांनी सांगितले.

पानी फाउंडेशनचे डॉ.पोळ यांनी जलसंधारणातून मन संधारण व ज्ञान संधारणातून समृद्धी विषयी माहिती दिली. स्पर्धेचे प्रमुख सहा घटक आणि त्यामुळे गावात येणाऱ्या शाश्वत समृद्धीबाबत त्यांनी विचार व्यक्त केले.

पानी फाउंडेशनचे श्री.ननावरे यांनी स्पर्धेविषयी माहिती देताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाची जोड स्पर्धेच्या कामात देण्याबाबत मार्गदर्शन केले.

वनपुरी गावचे राजेंद्र कुंभारकर यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते पोखर, बेलसर,गराडे, पानवडी, वनपुरी, मांढर, उदाचीवाडी, आंबळे, रिसे या गावांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, उपजिल्हाधिकारी वनश्री लामशेटवार, पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, वनपरिक्षेत्र अधिकारी,(प्रादेशिक) विशाल चव्हाण, पानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक आबासाहेब लाड आदी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *