समाजसेवेसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प करावा – राज्यपाल कोश्यारी.
गेल्या सात वर्षांच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश प्रगती पथावर नेला आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने समाजसेवेसाठी योगदान देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर शाखेच्या वतीने सेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या आयुर्वेदिक रुग्णालयासाठी प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त गोपाळ राठी, भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्याम शर्मा, राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्तात्रय चितळे, परिषदेच्या केंद्रीय संपर्क समितीचे सदस्य राजेंद्र जोग, शिवाजीनगर शाखा अध्यक्ष मंदार जोग उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले की, देशामध्ये रुग्णालयांची संख्या वाढली, तेथील अत्याधुनिक सुविधा वाढल्या, त्याचप्रमाणे विविध आजार वाढले तरी त्यावर उपचार होत आहेत. असे असले तरी रुग्णसेवेसाठी योगदान देण्याची गरज आहे आणि त्यासाठीच आज सर्वांनी संकल्प करण्याची आवश्यकता आहे. सेवा, समर्पण, संपर्क, संस्कार या विचाराने भारत विकास परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे आज मूर्त स्वरूप पाहण्यास मिळत आहे. या सूत्रांच्या माध्यमामुळे देश आणि समाज जोडला जात आहे. आज अनेक संस्था कार्यरत असल्या तरी परिषदेच्या कामाचा ठसा या कार्यांमुळे अधिक व्यापक झाला आहे, असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.
परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्री.शर्मा यांनी परिषदेच्या आजवरच्या वाटचालीची सविस्तर माहिती सांगितली. यावेळी ते म्हणाले की, आरोग्य, स्वयंरोजगार, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परिषद गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. त्याचप्रमाणे गरजूंना जयपूर फूटची उपलब्धता करून देण्यात येत आहे. समाजसेवेच्या कामासाठी देशभर असंख्य कार्यकर्ते काम करीत असले तरी अजूनही कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे.
श्री.राठी यांनी आपल्या मनोगतात आयुर्वेदिक रुग्णालयाबाबत सविस्तर माहिती सांगितली. त्याचप्रमाणे बदलत्या काळानुसार रुग्णांना आवश्यक असणार्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे स्पष्ट केले. महापौर मोहोळ यांनी पुणे शहरातील कोरोना महामारीची सद्यस्थिती स्पष्ट केली आणि महानगरपालिकेला वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची नुकतीच परवानगी मिळाल्याचे यावेळी जाहीर केले.
श्री. चितळे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकामधे विविध उपक्रमांची माहिती दिली. प्राणवायू निर्मिती प्रकल्प हा एक महत्वाकांक्षी उपक्रम असून तो देणगीदारांच्या सहकार्याने पूर्ण करता आला. देशामध्ये परिषदेच्या सुमारे चौदाशे शाखा कार्यरत आहेत. पुणे शहरातून सुमारे 18 हजारांपेक्षा अधिक जणांना कृत्रिम पाय बसवण्यात आले असल्याचे ते यावेळी म्हणाले.
प्रसिध्द अभिनेते व परिषदेचे विश्वस्त राहुल सोलापूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री. मंदार जोग यांनी आभार मानले. अमिता घुगरी यांनी संपूर्ण वंदेमातरम सादर केले. सामुदायिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.