सहकार महर्षी ग्रंथ निर्मितीबद्दल राज्यपालांचे गौरवोद्गार.
पुणे : महाराष्ट्रातील सहकार चळवळीत योगदान देणार्या दिग्गज व्यक्तींच्या जीवनचरित्रावर आधारित सहकार महर्षी ग्रंथाची महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री.भगतसिंग कोश्यारी यांनी दखल घेत विशेष दाद दिली.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यपाल पुण्यात आले होते, त्यावेळी सहकार सुगंध मासिकाचे व या ग्रंथाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी हा ग्रंथ त्यांना प्रदान केला.
महाराष्ट्र ही सहकार चळवळीची गंगोत्री आहेे तर संपूर्ण आयुष्य सहकार चळवळीसाठी वेचणार्यांचे जीवनचरित्र या संदर्भग्रंथाच्या रुपाने पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे, असे गौरवोद्गार राज्यपालांनी काढले व या ग्रंथास विशेष दाद दिली.
सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवणार्या आणि ती वर्धिष्णू करणार्या सहकार महर्षींच्या जीवनचरित्राचा समावेश असलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय मंत्री ना. नितीन ग़डकरी यांच्या हस्ते आऴंदी येथे झाले होते.
सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाने देखील या ग्रंथाची शिफारस करत सर्व महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थी व अभ्यासकांसाठी तसेच ग्रंथालयांनी हा ग्रंथ जरुर घ्यावा असे आवाहन केले आहे.
नऊशे पानांच्या या ग्रंथामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी योगदान दिलेल्या 7 महर्षींसह पश्चिम महाराष्ट्र (59), कोकण (15), विदर्भ (45), मराठवाडा (12) आणि उत्तर महाराष्ट्र (15) या विभागांमधील एकूण 153 सहकार महर्षींचा समावेश केला आहे.
या ग्रंथाच्या संपादक मंडळात डॉ.विखे पाटील सहकार अध्यासनाचे प्रमुख डॉ.मुकुंद तापकीर, ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई, विनायक कुलकर्णी, अशोक भट व अभ्यासक डॉ.अविनाश अभ्यंकर यांचा समावेश आहे. ग्रंथ मागणीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक 8805981673 आहे.