सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘स्वच्छ टेक्नोलॉजी चॅलेंज’.
पुणे महानगरपालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम.
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ टेक्नोलॉजी चॅलेंज’ ही स्टार्टअप विषयक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना १० हजारांपासून ते ५ लाखापर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्वच्छ टेक्नोलॉजी हा स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ चा एक भाग आहे. कचरा, प्लास्टिक निर्मूलन, सांडपाणी नियोजन आदी सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
विद्यापीठच्या माध्यमातून ऑटोमोटिव्ह ऑटोमेशन, पाणी व सांडपाणी व्यवस्थापन, शेती, आरोग्य, भौतिक विज्ञान आदी क्षेत्रात काम करत आहे. पालिकेसोबत काम करताना या कार्यकक्षा आणखीन विस्तारतील. अशा स्पर्धांमधून नक्कीच समाजोपयोगी उत्तरे सापडण्यास मदत होईल.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
याबाबत माहिती देताना पालिकेचे उपायुक्त अजित देशमुख म्हणाले, हे चॅलेंज समाज सहभाग (सोशल इन्कलूजन), शून्य कचरा व्यवस्थापन (झिरो डंप), प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन (प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट) आणि पारदर्शकता (ट्रान्स्फरन्सी) या चार मुख्य संकल्पनांवर आधारित असून यामध्ये अनेक उपघटक समाविष्ट आहेत.
यामध्ये राष्ट्रीय पातळीवर जाणाऱ्या विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी पाच लाख, द्वितीयसाठी अडीच लाख, तृतीय क्रमांकासाठी दीड लाख , चौथ्यासाठी एक लाख तर पाचव्या क्रमांकासाठी ७५ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे असे पालिकेच्या उपायुक्त व स्वच्छ अभियानाच्या समन्वयक आशा राऊत यांनी सांगितले.
इनोव्हेशन टू एंटरप्राइजेस’ स्पर्धेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आपण स्टार्टअप संस्कृती रुजवत आहोत. पालिकेबरोबर काम केल्यामुळे मूळ सामाजिक प्रश्नांवर काम करण्याची संधी सर्वांना मिळाली आहे. नक्कीच या संयुक्तीकरणातून नवीन स्टार्टअप उदयाला येतील.
– डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
प्राप्त झालेल्या अर्जातून छाननी समितीद्वारे निवडक टीम ना प्रत्यक्ष सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल असे पालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे यांनी सांगितले.
कोण सहभागी होऊ शकेल?
सर्वांसाठी खुली. (सामान्य नागरिक, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप, सामाजिक संस्था, नागरी सहकारी संस्था.)
सहभागी होण्यासाठी काय करावे?
इच्छुकांनी आपली नवकल्पना ५ ते ६ स्लाईड मध्ये आणि ५ मिनिटांच्या व्हिडीओ मधून मांडणे
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक
२४ डिसेंबर २०२१
अर्ज कुठे कराल?
लिंक-https://forms.gle/8umeAZXdRsCBzRvz5