Technology should be used for the simple life of common man
सामान्य माणसाच्या निरामय आयुष्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा – सुनीता वर्मा
इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन ॲडव्हान्सेस इन रेडिओलॉजी अँड रेडिओथेरपी – २०२३
मुंबई : तीव्र स्पर्धेमुळे “माणसाचे आयुष्य धकाधकीचे बनले आहे. त्यामध्ये नवनवीन आव्हानांची भर पडत असून त्यामुळे आयुष्यात विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. सामान्य माणसाच्या निरामय आयुष्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा, असे प्रतिपादन केंद्रीय इलेक्ट्रिक व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या समूह समन्वयक (ग्रुप को-ऑर्डिनेटर) सुनीता वर्मा यांनी आज केले.
आयआयटी, मुंबई येथील व्हीएमसीसी सभागृहात तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन ॲडव्हान्सेस इन रेडिओलॉजी अँड रेडिओथेरपी 2023’ चे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सध्या जग तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी भारताकडे आशेने बघत असल्याचे सांगत श्रीमती वर्मा म्हणाल्या, जगात सर्वात जास्त लोकसंख्या भारतात आहे. भारताचे विविध क्षेत्रांतील तंत्रज्ञानात प्राबल्य वाढत आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे.
कर्करोगाचे प्रमाणही वाढत आहे. या रोगाची निदानयंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे देशात कर्करोगावरील आधुनिक निदानयंत्रणा व उपचारपद्धती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. केंद्र शासन या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे. आरोग्य क्षेत्रातील नवीन उत्पादने स्पर्धेत येण्यासाठी शासन सवलती देत आहे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महाप्रीतचे श्री.श्रीमाळी म्हणाले की, महाप्रीतच्या माध्यमातून राज्य शासन नवनवीन संशोधनाला चालना देत आहे. प्रत्येक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणून सामान्य मनुष्याचे आयुष्य सुकर करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे समीर (सोसायटी फॉर अप्लाईड माईक्रोव्हेव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंग अँड रिसर्च) संस्थेसोबत काम करून आरोग्य क्षेत्रातील नवीन आव्हानांवर संशोधनाच्या माध्यमातून मात करण्याचा प्रयत्न महाप्रीत संस्था करेल.
आयुएसीचे श्री. पांडे म्हणाले की, कर्करोगाचे वाढणारे प्रमाण हे चिंताजनक आहे. भारतात 7 टक्के लोकसंख्या कर्करोगाने पीडित आहे. त्यामध्ये भरच पडत आहे. नवीन रेडिओलॉजी व रेडिओथेरपी तंत्रज्ञानातून कर्करोगाचे निदान व उपचार प्रभावीपणे करता येणार आहे.
आरोग्य क्षेत्रातील आव्हाने भारतीय तरूणांनी स्वीकारले असून यामध्ये आणखी संशोधन होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. समीर प्रकल्पाचे श्री. राव यांनी प्रस्ताविकात कॉन्क्लेव्हच्या आयोजनाचे महत्व सांगितले. त्यांनी सादरीकरण करून समीर प्रकल्पाची आतापर्यंतची प्रगती विषद केली. या परिषदेचा विद्यार्थी, संशोधक, उद्योजक यांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
समीर प्रकल्पाचे प्रकल्प संचालक श्री. हर्ष यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन श्री. देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला डिफेन्स, आरोग्य क्षेत्रातील संशोधानवर आधारित उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान समीर प्रकल्प व महाप्रीत संस्थादरम्यान या क्षेत्रातील संशोधनाबाबत सामजंस्य करार करण्यात आला. तसेच पारस डिफेन्स टेक्नॉलॉजी, वेदांत रेडिओ टेक्नॉलॉजी यांनीही समीर सोबत सामजंस्य करार केला. कार्यक्रमाला विद्यार्थी, संशोधक उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com