MeitY organises the 26th CISO Deep Dive Training program under the Cyber Surakshit Bharat initiative.
सायबर सुरक्षित भारत उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून 26 व्या सीआयएसओ डीप डाइव्ह प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.
नवी दिल्ली : देशातील सायबर सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-प्रशासन विभागामार्फत सहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सीआयएसओ म्हणजेच मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी आणि विविध मंत्रालये व विभागांत माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित आघाडीवर काम करणारे अधिकारी, केंद्र व राज्य शासनांतील सरकारी व निमसरकारी संस्था, सार्वजनिक उपक्रम, बँका यांतील अधिकाऱ्यांसाठी हा डीप डाइव्ह प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जात आहे.
हे प्रशिक्षण म्हणजे सायबर सुरक्षित भारत उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय इ-प्रशासन विभागाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यशाळांच्या मालिकेचा भाग आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात, सायबर सुरक्षा विभागाच्या संचालिका तुलिका पांडे यांनी सहभागी झालेल्या सर्वांना आपले अनुभव आणि अभिप्राय परस्परांना सांगण्याचे आवाहन केले. परस्परांच्या अनुभवांतून सर्वांना शिकता यावे आणि सुरक्षा प्रणाली अधिकाधिक बळकट करता याव्यात, असा यामागील उद्देश होता.
जून 2018 पासून डिसेंबर 2021 पर्यंत, 25 तुकडयांना प्रशिक्षण देण्यात आले असून सुमारे 1018 सीआयएसओ आणि अन्य आघाडीवरील माहिती तंत्रज्ञान अधिकारी, सार्वजनिक उपक्रम तसेच बँकांमधील अधिकारी सरकारी संस्थांतील अधिकारी यातून प्रशिक्षित झाले आहेत.
17 ते 22 जानेवारी 2022 या काळात हा प्रशिक्षण कार्यक्रम होत असून यामध्ये पुढील विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे- डेटाच्या खासगीपणाच्या संदर्भात प्रशासनातील धोके व अटी, नेटवर्क सुरक्षा, एन्ड पॉईंट सुरक्षा, अप्लिकेशन आणि डेटाची सुरक्षा, क्लाउड सुरक्षा, मोबाईल सुरक्षा, क्रिप्टोग्राफी,माहिती तंत्रज्ञान कायद्यातील सायबर सुरक्षाविषयक तरतुदी, सुरक्षा तपासणी, सीसीएमपी तयार करण्याच्या मार्गदर्शक सूचना, सुरक्षा कार्यान्वयन केंद्राचे कार्यान्वयन आणि देखरेख इत्यादी.