सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कारकुन संवर्गातील भरती हिंदी व इंग्लिश सोबत 13 प्रादेशिक भाषांमधूनही व्हावी अशी अर्थ मंत्रालयाची शिफारस
सध्या सुरु असलेली 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कारकुन संवर्गाची भरतीप्रक्रिया राबवताना पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा हिंदी व इंग्लिश सोबत 13 प्रादेशिक भाषांमधूनही व्हावी, तसेच यापुढील भरतीच्या वेळीदेखील हीच पद्धत वापरावी अशी शिफारस अर्थ मंत्रालयाने केली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSBs) कारकुन संवर्गासाठी प्रादेशिक भाषेतून परीक्षा घेतली जाण्यासंबंधी अर्थ मंत्रालयाने गठीत केलेल्या एका समितीने केलेल्या शिफारशींवर हा निर्णय आधारित आहे.
सर्व ठिकाणच्या स्थानिक युवकांना रोजगाराची समान संधी मिळावी, तसेच ग्राहकांशी स्थानिक भाषेतून संवाद साधताना त्यांच्या भाषाकौशल्याचा फायदा मिळावा या हेतूने समितीने हि शिफारस केली आहे.
कारकुन संवर्गाची परीक्षा प्रादेशिक भाषांमधून घेण्याचा हा निर्णय भारतीय स्टेट बँकेच्या भविष्यकाळातील रिक्त जागांसाठी लागू होईल. भारतीय स्टेट बँकेच्या सध्या सुरु असलेल्या भरती प्रक्रियेतील ज्या पदांची जाहिरात याआधीच प्रसिद्ध झाली होती व ज्यांची पूर्व परीक्षा झालेली आहे, अशा पदांची भरती प्रक्रिया जाहिरातीत दिल्याप्रमाणे पूर्ण केली जाईल.