Vacancies of Public Works Department Engineers to be filled immediately.
सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची रिक्त पदे तातडीने भरणार – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
मुंबई : राज्यातील पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2 व कनिष्ठ अभियंत्यांची १ हजार २४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची १ हजार ५३६ रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.
या विभागाचा आकृतीबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.
मंत्रालयातील दालनात शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक वर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्यमंत्री श्री.भरणे बोलत होते.
राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता श्रेणी 2, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
कमी मनुष्यबळात काम करणे कठीण आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने आकृतीबंध तयार केला असून वित्त विभागाला मान्यतेसाठी पाठवलेला आहे. याला मान्यता मिळताच तत्काळ पदभरती होणार आहे.