सीमा रस्ते संघटनेच्या यशाला गिनीज जागतिक विक्रमांच्या यादीत स्थान.
नवी दिल्ली: लडाखमधील उमलिंगला पास येथे 19,024 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच ठिकाणचा मोटारप्रवासासाठीचा रस्ता बांधून त्यावर ब्लॅक टॉपिंग केल्यात यश मिळविल्याबद्दल 16 नोव्हेंबर 2021 रोजी सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांना जागतिक विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या गिनीज संस्थेकडून प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे. युनायटेड किंगडम येथील गिनीज जागतिक विक्रम संस्थेचे अधिकृत निर्णय अधिकारी रिशी नाथ यांनी एका आभासी कार्यक्रमात सीमा रस्ते संघटनेच्या जगातील सर्वात उंचीवरचा मोटार प्रवासासाठीचा रस्ता बांधण्यात मिळालेल्या यशाची पोचपावती दिली. गिनीज जागतिक विक्रम संस्थेच्या चार महिने सुरु असलेल्या प्रक्रियेतून पाच विविध सर्वेक्षकांनी सीमा रस्ते संघटनेच्या या विक्रमाची निश्चिती केली आहे.
चिसुमले ते डेमचोक हा 52 किलोमीटर लांबीचा हा डांबरी रस्ता 19,024 फूट उंचीवरील उमलिंगला पास मधून जातो आणि या रस्त्याने बोलिव्हिया मधील उतुरुंकू ज्वालामुखीकडे जाणाऱ्या 18,953 फूट उंचीवरील रस्त्याचा उंचीचा विक्रम मागे टाकला आहे. उमलिंगला पास रस्ता प्रगती करणाऱ्या भारताच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे कारण हा रस्ता एवरेस्ट पर्वताचा 16,900 फुटावरील उत्तर बेस कॅम्प आणि 17,598 फुटावरील दक्षिण बेस कॅम्प यांच्याहीपेक्षा अधिक उंचीवर बांधला गेला आहे.
या प्रसंगी सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी उमलिंगला पास येथे रस्ते बांधणीच्या कामादरम्यान समोर आलेल्या आव्हानांची माहिती दिली. हा रस्ता बांधताना तेथे हिवाळ्यात तापमान उणे 40 अंश सेल्सियस पर्यंत कमी होते आणि प्राणवायूची पातळी सामान्य पातळीपेक्षा 50 टक्के कमी होते अशा अत्यंत कठीण परिस्थितीत मानवी स्फूर्ती आणि यंत्रांची कार्यक्षमता यांची परीक्षा घेतली असे त्यांनी सांगितले.
सीमा रस्ते संघटनेने पूर्व लडाखमधील डेमचोक या महत्त्वाच्या गावापर्यंत ब्लॅक टॉप्ड रस्ता बांधून दिला. हा रस्ता लडाखमधील सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारण्यात आणि येथील पर्यटनाला चालना देण्यात महत्त्वाचा असल्यामुळे या प्रदेशातील स्थानिक जनतेसाठी एक वरदान ठरणार आहे.
धोरणात्मकरित्या महत्त्वाचा असलेला हा 15 किलोमीटर लांबीचा रस्ता सीमा प्रदेशांमध्ये रस्तेविषयक पायाभूत सुविधा विकास करण्यावर सरकारने कशा प्रकारे लक्ष केंद्रित केले आहे हे अधोरेखित करतो.