सेंच्युरियन कसोटी: भारतीय क्रिकेट संघांची विजयी कामगिरी.
सेंच्युरिअन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरिअन इथं झालेला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं ११३ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं या तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विजयासाठी ३०५ धावांचा पाठलाग करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेनं आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी आपला दुसरा डाव कालच्या ४ बाद ९४ या धावसंख्येवरून पुढे सुरु केला. मात्र त्यांचे उर्वरीत ६ फलंदाज केवळ ९७ धावांची भर घालू शकले. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ १९१ धावांमध्ये माघारी परतला. डिन एल्गर यानं सर्वाधिक ७७ धावा केल्या. भारताच्या वतीन जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी ३, तर मोहम्मद सिराज आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
या सामन्यात पहिल्या डावात शतकी खेळी केलेल्या के.एल. राहुल याला सामनावीराचा किताब मिळाला.
या मालिकेतला दुसरा सामना येत्या ३ जानेवारीपासून जोहान्सबर्ग इथं, तर तीसरा आणि अखेरचा सामना येत्या ११ जानेवारीपासून केप टाऊन इथं खेळवला जाणार आहे.