सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलनामध्ये अधिकाधिक सहभाग द्या
-निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे.
पुणे : देशाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या सशस्त्र दलातील वीर जवानांच्या कुटुंबियांच्या हिताची काळजी घेण्याची जबाबदारी आपली सर्वांची असून सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलनामध्ये आपला अधिकाधिक सहभाग द्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजदिन 2021 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे, सहायक सैनिक कल्याण अधिकारी बबन खंडाळे यांच्यासह माजी सैनिक तसेच त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
श्री. खराडे म्हणाले, देशाच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी सैनिकांवर आहे. आज सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून सैनिकांच्या कुटुंबांची काळजी घेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी संकलन करण्याचे महत्वूंचपर्ण कार्य आहे.
सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्ताने संकलित केलेला निधी सैनिक, माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येतो. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी ध्वजदिनी निधी संकलनात पुढाकार घ्यावा,समाजातील प्रत्येक घटकाने ध्वजनिधीसाठी सहाय्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले तसेच सैनिकांच्या तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांनी मिळविलेल्या यशाबदल त्यांनी सर्वांचे कौतुक केले.
प्रास्तविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासणे म्हणाले, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या अडी-अडचणी दूर केल्या जातात. कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा उपयोग केला जातो. कोरोना संक्रमणामुळे उद्भवलेल्या आपत्तीजनक स्थितीतही नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे; 1 कोटी 50 लाख रुपयांचे उद्दिष्ट साध्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना दिवसाचे बॅचेस लावण्यात आले आणि ध्वजदिन निधी संकलनाच्या शुभारंभप्रसंगी निधी संकलित करण्यात आला.
विशेष गौरव पुरस्काराने पाल्यांचा सत्कार
विशेष कामगिरी केलेल्या माजी सैनिक तसेच दहावी, बारावी परिक्षेत यश मिळविलेल्या सैनिकांच्या पाल्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. राजेश आंबोकर, रमेश सांगळे, बालाजी श्रीराम गायकवाड, शांताराम होले, धर्मराज दौंडकर, प्रमोद कार्वे, संजय वाघ, किरण वैद्य, संतोष डांगले यांचा विशेष पुरस्काराने धनादेश देवून गौरव करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक, विरमाता, विरपत्नी यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.