स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.
सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीदान समारंभ.
पुणे : विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्यानंतर स्नातकांनी आपल्या प्रदेशातील; शालेय विद्यार्थ्यांसाठी तेथील भाषेत विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान उपलब्ध करून दिल्यास ती देशाची मोठी सेवा ठरेल आणि नव्या पिढीला त्यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कुलपती डॉ.एस.बी. मुजुमदार, मुख्य संचालिका आणि प्र-कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ.रजनी गुप्ते, कुलसचिव डॉ.एम.एस.शेजुळ, परीक्षा नियंत्रक श्रद्धा चितळे आदी उपस्थित होते.
श्री.कोश्यारी म्हणाले, शिक्षण क्षेत्रात संशोधनासोबत सृजनशीलतेलाही महत्व आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला महत्व असलेल्या युगात मूल्याची जाण ठेवणेही महत्वाचे आहे. विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा आणि मूल्यांच्या विकासावरही भर द्यावा. नव्या शैक्षणिक धोरणात या बाबींवर भर देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषेत देताना सोबत इंग्रजीचे शिक्षण दिल्यास त्यांचा विकास चांगल्याप्रकारे होईल. स्नातकांनी त्यासाठी प्रादेशिक भाषेत पुस्तके लिहिण्याचे काम केल्यास ती समाजाची मोठी सेवा ठरेल.
सिम्बॉयसिस विद्यापीठ विश्वबंधुत्वाचे प्रतीक आहे. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी आपण जागतिक पातळीवर एकत्र येणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवर प्रगतीची झेप घेताना विद्यार्थ्यांनी आपला देश, राज्य आणि गावाच्या प्रगतिकडेही लक्ष द्यावे. जगाच्या कल्याणाचा विचार करताना देशाच्या उत्कर्षाचा विद्यार्थ्यांनी प्राधान्याने विचार करावा. शैक्षणिक प्रगतीला विनयाची जोड दिल्यास आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारल्यास जीवनात अधीक चांगले यश संपादन करता येईल, असे ते म्हणाले.
यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा संदेश दाखविण्यात आला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा उपयोग देशाच्या उन्नतीसाठी करावा. विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हाने आहेत. मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी या आव्हानांवर मात करीत यश संपादन करावे असे त्यांनी सांगितले. त्यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
डॉ.मुजुमदार म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्राला भारतीय चेहरा मिळाला आहे. भारतीय ज्ञानप्रवाहाचा शिक्षणात समावेश करताना ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावनाही त्यात समाविष्ट आहे. सिम्बॉयसिस विद्यापीठाने या धोरणानुसार वाटचाल सुरू ठेवली आहे. साहचर्य आणि स्वावलंबन हा विद्यापीठाचा आत्मा आहे. सर्व भेद बाजूला सारून वैश्विक भावनेचा संदेश देताना पर्यावरण संवर्धनासारख्या महत्वाच्या विषयावरही विद्यापीठाने लक्ष दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती येरवडेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली. डॉ.गुप्ते यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.
राज्यपाल महोदयांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.