गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांसाठी सुरु केला ‘सोनचिडिया’ हा ब्रँड.
60 लाख सदस्यांसह विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5.7 लाखांहून अधिक स्वयंसहाय्यता गटांची स्थापना
25 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील 5000 स्वयंसहाय्यता गटांची 2,000 पेक्षा अधिक उत्पादने ई-कॉमर्स पोर्टलवर उपलब्ध
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी आज शहरी स्वयंसहाय्यता गट (एस एच जी) उत्पादनांच्या विपणनासाठी ‘सोनचिडिया’– (ब्रँड आणि प्रतीकचिन्ह) चे अनावरण केले. ब्रँड आणि प्रतीकचिन्हाचे अनावरण करताना ते म्हणाले की, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना सन्मानाने जीवन जगण्यास मदत करणे हे सरकारच्या प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानाने शहरी गरीब महिलांना पुरेसे कौशल्य आणि संधींसह सुसज्ज करण्यावर आणि शाश्वत सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या महिलांना पाठबळ देणारी यंत्रणा निर्माण करण्यासाठी शहरी गरीब घरांतील महिलांना स्वयंसहाय्यता गट आणि त्यांच्या संघटनांमध्ये एकत्रित केले जाते. सुमारे 60 लाख सदस्यांसह विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5.7 लाखांहून अधिक स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी बरेच स्वयंसाहाय्यता गट उपजीविकेच्या कामात गुंतलेले आहेत, हस्तकला, कापड, खेळणी, खाण्यायोग्य वस्तू इत्यादी वस्तूंचे उत्पादन हे गट करतात. ही उत्पादने प्रामुख्याने शेजारच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये विकली जात होती आणि अनेकदा यासाठीची आगाऊ सूचना आणि विस्तृत बाजारपेठ मिळवण्यात अडथळ्यांना तोंड द्यावे लागत होते , या आव्हानांवर मात करण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी मंत्रालयाने अग्रगण्य ई-कॉमर्स पोर्टल्स उदा. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्यासह सामंजस्य करार (एमओयू) केला. कोविड -19 महामारीच्या आव्हानांनंतरही या भागीदारीने ई-कॉमर्स पोर्टलवर 25 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे 5,000 स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांच्या 2,000 उत्पादनांनी यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. स्वयंसहाय्यता गटांना दिलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे त्यांना ई-पोर्टलवर सहजतेने विक्री करणे सुनिश्चित झाले आहे. खाते नोंदणी, किंमती, पॅकेजिंग, री-ब्रँडिंग इत्यादींसाठी थेट प्रात्यक्षिके देखील ई-पोर्टल्स आणि राज्य शहरी उपजीविका अभियानाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली.
हा उपक्रम शहरी स्वयंसहाय्य्यता गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांसाठी आगाऊ माहिती आणि जागतिक प्रवेशाच्या दिशेने एक पाऊल म्हणून निश्चितपणे सिद्ध होईल. विविध प्रकारचे व्यावसायिकरित्या पॅक केलेली, हाताने तयार केलेली पारंपरिक उत्पादने, जागतिक स्तरावर ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे अनेक स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्यांना मदत करण्याची मंत्रालयाची इच्छा आहे.