स्वर्णिम विजय वर्ष विजय मशालीचा युद्ध स्मारकात सन्मान.
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील गौरवशाली विजय आणि बांगलादेश निर्मिती यांचा सन्मान म्हणून, संपूर्ण राष्ट्र 2021 हे वर्ष स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे करत आहे. 16 डिसेंबर 2020 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात शूर सैनिकांना अर्पण केलेली श्रद्धांजली आणि चार मुख्य दिशांना चार विजयी मशालींच्या प्रस्थानाने या विजयोत्सवाचा प्रारंभ झाला.
दक्षिण कमांड क्षेत्रातील जिल्हा, नगरे आणि शहरे येथून मार्गस्थ होत पश्चिम दिशेने निघालेली विजय मशाल आज पुण्यात पोहोचली. कात्रज येथे मशालीचे भव्य स्वागत झाले. त्यानंतर उत्साही दुचाकीस्वार कौन्सिल हॉल आणि नंतर युद्ध स्मारकाकडे ज्योत घेऊन गेले.
विजय मशालीचे स्वागत-सन्मानासाठी दक्षिण कमांड युद्ध स्मारकात एक भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रतिष्ठित व्यक्ती आणि ज्येष्ठ माजी सैनिक अधिकाऱ्यांनी युद्ध स्मारकापर्यंत शेवटच्या टप्प्यात नेलेल्या विजय मशालीचे लेफ्टनंट जनरल जेएस नैन, GOC-in-C दक्षिणी लष्कर कमांड यांनी स्वागत केले. 1971 च्या युद्धादरम्यान सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमामुळे मिळालेला निर्णायक विजय आणि 93,000 पाकिस्तानी सैनिकांचे आत्मसमर्पण ज्यामुळे युद्धाच्या इतिहासात दैदिप्यमान कामगिरीची झालेली नोंद याचे स्मरण लेफ्टनंट जनरल नैन यांनी करून दिले. हा विजय साध्य करण्यासाठी लेफ्टनंट जनरल नैन यांनी बांगलादेशच्या ‘मुक्ती जोधांच्या’ अमूल्य योगदानाचाही उल्लेख केला. या कार्यक्रमाला बांगलादेशचे उप उच्चायुक्त श्री लुत्फोर रहमान उपस्थित होते.
या कार्यक्रमाला वीर नारी, जेष्ठ माजी सैनिक आणि 1971 च्या युद्धातील दिग्गजांनीही उपस्थिती लावली होती. आर्मी कमांडर यांनी या दिग्गजांचा आणि वीर नारींचा सत्कार केला आणि त्यांच्याबद्दल दृढ ऐक्य आणि कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यातील विजय मशालीच्या मुक्कामाच्या नियोजित महिन्याभराच्या उत्सवात, विजय मशाल आयएनएस शिवाजी लोणावळा, पुणे विद्यापीठ, शनिवार वाडा, फर्ग्युसन महाविद्यालय, शिवाजी नगर, पोलीस परेड ग्राउंड इत्यादी महत्वाच्या ठिकाणी नेली जाईल. 09 ऑक्टोबर 21 रोजी RWITC येथे हवाई प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर ज्योत 31 ऑक्टोबर 2021 रोजी नाशिकसाठी मार्गस्थ होईल.