हल्दिया गोदी परिसरात केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांच्या हस्ते प्रकल्पांचे उद्घाटन, भारतीय जलमार्गांचा झपाट्याने विस्तार होत असल्याचे केले प्रतिपादन.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्य मंत्री शांतनू ठाकूर यांनी आज कोलकाता इथल्या श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातल्या हल्दिया गोदी परिसरात अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. वादळामुळे आलेल्या पाण्याचा निचरा करण्यातल्या सुधारणा आणि रस्ते रुंदीकरण, माल हाताळणी क्षेत्रात 41000 चौरस मीटरचा समावेश, बंदर गेस्ट हाउसमध्ये सुधारणा आणि बंदर रुग्णालयाच्या नव्या अति दक्षता विभाग आणि आपत्कालीन कक्षाचा यात समावेश आहे. खासदार दिव्येंदू अधिकारी, कोलकाता पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष विनीत कुमार यांच्या सह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भारतीय जलमार्ग व्यवस्था इतक्या झपाट्याने विस्तारत आहे की कोणताही देश त्याची बरोबरी करू शकत नाही असे ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दृष्टीकोनाची अंमलबजावणी करण्यासाठी बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले. हल्दिया गोदीला दिलेली आजची भेट म्हणजे सर्वांसाठी विकास हा पंतप्रधानांचा दृष्टीकोन साकारण्याच्या दिशेने एक पाऊल असल्याचे ते म्हणाले.