हुतात्म्यांच्या नावाने प्रसिद्धी मिळविणाऱ्यांना आवरा- सामान्यांचा आक्रोश

हुतात्म्यांच्या नावाने प्रसिद्धी मिळविणाऱ्यांना आवरा- सामान्यांचा आक्रोश.

Gunner Farate Sourabh Nandkumar
Image by Honeurpoint.in

हडपसर / पुणे : देशाच्या सीमेवर २४ बाय ७ खडा पहारा देणारा सैनिक जागा आहे, वेळप्रसंगी त्यांना प्राणाची आहुती द्यावी लागत आहे. म्हणूनच आपण सुरक्षित आहोत. त्याच हुतात्म्यांच्या नावानं प्रसिद्धी मिळविणाऱ्यांना आवर घाला अशीच वेळ आता आली आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील पम्पोर शहरात भरगर्दीच्या ठिकाणी १७ डिसेंबर २०१६ रोजी लष्करी ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भेकराईनगर, फुरसुंगी येथील जवान सौरभ फराटे यांच्यासह दोन जवान धारातीर्थी पडले होते.

फुरसुंगी (ता. हवेली) येथील सौरभ फराटे यांना १७ डिसेंबर २०२१ रोजी हुतात्मा होऊन पाच वर्षे पूर्ण झाली. त्यांचे स्मारक व्हावे यासाठी हडपसरमधील अनेक मंडळींनी गाजावाजा केला. मात्र, अद्याप त्याला मुहूर्त मिळाला नाही.

ज्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच दिवशी पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation)  त्यांचे स्मारक हडपसर परिसरात बांधले जाईल असे जाहीर केले होते. यावेळी स्थानिक नेते मंडळींनीही प्रचंड गाजावाजा केला. त्यांची भाषणे हवेतच विरली नाही, तर त्यांनी फुकट प्रसिद्धीही मिळवून घेतली. आता प्रसिद्धी मिळत नाही म्हटल्यावर ते बाजूला गेल्याचे चित्र दिसत आहे.

तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांनी हुतात्मा सौरभ फराटे यांचे स्मारक उभारण्याची जाहीर घोषणा केली होती. स्मारक फार दूरची बाब आहे, त्यासाठी जागासुद्धा निश्चित करता आली नाही, हे आमच्या हुतात्म्यांचे दुर्दैव आहे का असे म्हणण्याची वेळ आली आहे.

आश्वासन आणि भाषणबाजी पळापळा पुढे कोण…
हुतात्मा सौरभ फराटे यांच्या स्मारकासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही माजी आमदार विजय शिवतारे यांनी दिली होती.

वृतपत्राचे रकाने भरभरून बातम्या छापून आल्या. मात्र, प्रत्यक्षात कामाला अद्यापही कोणाकडून मुहूर्त मिळाला नाही, ही बाब लाजीरवाणी आहे.

दरम्यान, सौरभच्या स्मारकासाठी जागा मिळावी यासाठी फराटे कुटुंबीयांनी पालिकेसमोर उपोषण सुद्धा केले होते. तेव्हा महापालिकेतर्फे स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. दिखावा करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी जागांची पाहणी करत धावपळ केली. त्यामध्ये त्रुटी काढल्या आणि तो प्रश्न पुन्हा धूळखात पडला. महापालिकेच्या वतीने विविध विकासकामे आणि शहर सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो.

हडपसरमधील राजकीय मंडळी स्वागताच्या फलकासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत. त्यासाठी जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे. भेकराईनगरमध्ये ज्यांना जनमानसामध्ये कोणी ओळखत नाही त्याच्या नावाच्या कमानी बांधण्यात येत आहे. मात्र, हुतात्म्याचे स्मारक व्हावे, असे कोणाही नेत्याला अद्याप का वाटले नाही, असे प्रश्न सामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही.

हुतात्मा सौरभ फराटे यांच्या स्मारकासाठी जागा, निधी उपलब्ध होऊ शकेल का, त्यासाठी फक्त राजकारणच केले जाईल, याचे उत्तर लोकप्रतिनिधींना मतदारांनी विचारला पाहिजे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *