Police ordered to investigate the agitation of students regarding 10th-12th exams.
१०वी-१२वीच्या परीक्षेसंदर्भातल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश.
मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्याच्या काही भागात आज विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता आलेलं नाही. त्यामुळं दहावी तसंच बारावीच्या परीक्षा यंदा रद्द कराव्या. पुढच्या वर्षी ऑफलाईन शाळा सुरू केल्यानंतरच परीक्षा घ्यावात, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती.
मात्र एकाचवेळी राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या या आंदोलनाच्या चौकशीचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं आहे.
इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी. विद्यार्थ्यांनी सरकारकडे भूमिका मांडायला हवी होती, रस्त्यावर येऊन आंदोलन करणं योग्य नसल्याचं ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री योग्य मार्ग काढतील.
विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी सरकारला आहे. यामध्ये सरकार निश्चितपणे मदत करण्याची भूमिका घेईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.