Deworming pill for all boys and girls aged 1 to 19 years
१ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी
आरोग्य विभागाची १३ फेब्रुवारीला विशेष मोहीम
पुणे : जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमियासह पोटाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागते. यावर उपाययोजनेच्या अनुषंगाने वर्षातून दोनदा जंतनाशक गोळी देण्याच्या विशेष मोहिमेंतर्गत येत्या १३ फेब्रुवारीला १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.
जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजारांचा धोका असतो. त्यामुळे १ ते १९ वयोगटातील मुलांना वर्षातून दोन वेळा आरोग्य विभागाकडून शिक्षण विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने सप्टेंबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जंतनाशक गोळी देण्यात येते. याअंतर्गत अर्धी ते एक गोळी खायला किंवा पाण्यात विरघळून दिली जाते.
मोहिमेअंतर्गत १३ फेब्रुवारीला गोळी न घेऊ शकणाऱ्या मुलांना २० फेब्रुवारीला जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. राज्यभरात १३ फेब्रुवारी रोजी जवळपास २ कोटी ८० लाख मुला-मुलींना १ लाख १० हजार ९४४ अंगणवाडी केंद्रे, १ लाख २७ हजार ८४९ शाळा व महाविद्यालयांमध्ये जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जंतनाशक मोहिमेमध्ये १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २०० मि.ग्रॅ. अल्बेंडाझोलची गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते. २ ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी पावडर करून व पाण्यात विरघळून देण्यात येते. ३ ते ६ वर्षे वयोगटाच्या बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास किंवा पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते. ६ ते १९ वर्षे वयाच्या मुला-मुलींना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास देण्यात येते. वर्षातून दोन वेळा ही गोळी घ्यायला हवी. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
या मोहिमेविषयी काही शंका असल्यास आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४ वर नागरिक संपर्क करू शकतात किंवा गरज भासल्यास तातडीच्या वैद्यकीय सेवेअंतर्गत कार्यरत रुग्णवाहिका सेवेच्या टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क करुन रुग्णवाहिका मागवू शकतात.
मोफत मिळते जंतनाशक गोळी
अल्बेंडाझोल ही गोळी मोहिमेच्या दिवशी मोफत दिली जाते. तसेच आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यासोबतच अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांतही या गोळ्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जंतसंसर्गाच्या प्रतिबंधासाठी दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर जंतनाशक कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित करण्यात आलेली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “१ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी”