३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी.
मुंबई : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेवून; नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने ३१ डिसेंबर, २०२१ (वर्ष अखेर) व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कोरोनाच्या अनुषंगाने दि.३१ डिसेंबर, २०२१ रोजी व दि.१ जानेवारी २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणाने साजरे करावे. राज्यात २५ डिसेंबर पासून रात्री ९:०० ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे पालन करण्यात यावे.
कोवीड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. ३१ डिसेंबर, २०२१ व नूतन वर्ष, २०२२ चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५०% पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५% च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सुरक्षित अंतर राखले जाईल. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. तसेच ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही गृहविभागाने दिल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
कोविड १९ व विशेषत्वाने ओमायक्रॉन या विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील, असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.