३ रोल मॉडेलची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट; आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव.

3 Role models visit Maharashtra Parichaya Kendra

३ रोल मॉडेलची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट; आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव.

नवी दिल्ली : अपंगत्वावर मात करून स्वकर्तृत्चाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नागपूरचे राजेश असुदानी, कोल्हापूरचा प्रथमेश दाते आणि मूळची महाराष्ट्राची व सद्या दिल्लीकर देवांशी जोशी या राष्ट्रीय दिव्यांग रोल मॉडेल पुरस्कार विजेत्यांनी काल महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.3 Role models visit Maharashtra Parichaya Kendra

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या तिघांनाआज राष्ट्रीय दिव्यांग रोल मॉडेल पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर त्यांना महाराष्ट्र परिचय केंद्रात आमंत्रित करण्यात आले.

परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.)अमरज्योत कौर अरोरा यांनी या तिन्ही रोल मॉडेलचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेत या तिन्ही रोल मॉडेलनी आपल्या कार्याविषयी माहिती दिली.

राजेश असुदानी यांना दृष्टीबाधीत श्रेणीत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा राष्ट्रीय दिव्यांग रोल मॉडेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जन्मत:च अंधत्व आलेल्या श्री.असुदानी यांनी समोर आलेल्या संकटांना धिरोदात्तपणे सामना करून यश संपादन केले.

नागपूर विद्यापीठातून त्यांनी एम.ए.( इंग्रजी) आणि एल.एल.बी. पदवी परीक्षा 19 सुवर्णपदक पटकावत उत्तीर्ण केली. आयुष्याचा प्रवास शुन्यापासून सुरु होवून शुन्यावर स्थिरावला असे वर्णन करताना त्यांनी सांगितले, शाळेत पहिल्या वर्गात शुन्य गुण मिळाले होते आणि आता झिरोमाईलची खुण असणाऱ्या नागपूर शहरात आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहोत.

श्री अदुसानी हे कवी व लेखक असून त्यांची तीन पुस्तके प्रकाशित आहेत. दिव्यांगांच्या शिक्षण व रोजगारासाठी ते सक्रियरित्या दोन संस्थासोबत जुळले आहेत.

‘प्रथमेश दाते’ यांस बौध्दिक अक्षमता श्रेणीत राष्ट्रीय दिव्यांग रोल मॉडेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जन्मत: गतीमंद असलेल्या प्रथमेशला सर्वसमान्य मुलाप्रमाणे जगता यावे यासाठी त्याची आई शारदा व वडील प्रकाश दाते यांनी अपार कष्ट उपसले.

प्रथमेशवर विविध उपचार झाले व त्याने सर्वसामान्य मुलांच्या शाळेतून 9 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढे प्रथमेशने संगणक,डीटीपी व ग्रंथालयासंबंधीचे ज्ञान अवगत केले व गेल्या 15 वर्षांपासून इचलकरंजी येथील डी.के.टी.ई. संस्थेच्या टेक्स्टाइल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहाय्यक ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे.

प्रथमेशची आंतरराष्ट्रीय मंचावर भाषणे झाली आहेत. गतीमंद प्रथमेशचा इंटरनॅशनल सेलिब्रेटी पर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. प्रथमेशला यापूर्वीही वर्ष २०१० मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा ‘उत्कृष्ट कर्मचारी’ राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

देवांशी जोशी यांना बौध्दिक अक्षमता श्रेणीत राष्ट्रीय दिव्यांग रोल मॉडेल पुरस्कार जाहीर झाला आहे. देवांशी ही जन्मत: डाऊन सिंड्रोम आजाराने ग्रस्त आहे. मूळच्या नागपूरच्या देवांशी यानी नॅशनल ओपन स्कूल मधून 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

दिल्लीतील वसंत कुंज येथील ब‍िग बाजारमध्ये त्या सध्या फॅशन विभागात पूर्णवेळ कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी 2016 मध्ये त्यांना केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या ‘उत्कृष्ट कर्मचारी’ राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या तिन्ही रोल मॉडेलसह महाराष्ट्रातील आठ दिव्यांग आणि नाशिक येथील सर्वाजनिक बांधकाम विभागाला वर्ष 2020 चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात सांगलीच्या डॉ.पुनम उपाध्ये, मुंबईच्या निक‍िता राऊत, पुण्याच्या सनिका बेदी, लातुरच्या प्रिती पोहेकर, कोल्हापूरचे देवदत्ता माने, मुंबईच्या नेहा पावसकर, औरंगाबादचे सागर बडवे आणि कोल्हापूरच्या वैष्णवी सुतार यांचा समावेश आहे.

उद्या शुक्रवारी विज्ञानभवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या सर्वांना गौरविण्यात येणार आहे .

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *