100 new Sainik schools to provide more opportunities for girls to join the Armed Forces.
100 नवीन सैनिकी शाळांमुळे मुलींना सशस्त्र दलात भरती होण्याच्या अधिक संधी उपलब्ध : संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन.
दिल्ली : “100 नवीन सैनिकी शाळा सुरू करण्यामुळे मुलींना सशस्त्र दलात सामील होण्याची आणि राष्ट्रीय सुरक्षेत योगदान देण्याची संधी मिळेल,” असे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. आज 8 जानेवारी 2022 रोजी आयोजित केलेल्या सैनिक शाळांवरील वेबिनारमध्ये संरक्षणमंत्री राजनाथसिंह अध्यक्ष म्हणून उपस्थितांना संबोधित करत होते. श्री राजनाथ सिंह म्हणाले, “सशस्त्र दलांमध्ये महिलांचे योगदान वाढविण्यावर सरकारचा विश्वास आहे आणि त्या दिशेने अनेक पावले उचलण्यात आली आहेत, ज्यामध्ये सैनिकी शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करणे आणि महिला अधिकाऱ्यांना संरक्षण दलांमध्ये परमनंट कमिशन देणे यांचा समावेश आहे. नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याचा निर्णय मुलींना त्यांचे देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रोत्साहित करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सैनिकी शाळांचा विस्तार ही घोषणा मुलांच्या मूलभूत शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि देशाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी, सरकारने गेल्या सहा-सात वर्षांत घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी एक असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले. संरक्षण आणि सैनिकी शाळांतील शिक्षण यांचे एकत्रीकरण आगामी काळात राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आकांक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘सैनिक’ हे एकता, शिस्त आणि भक्तीचे प्रतीक असले तर ‘शाळा’ हे शिक्षणाचे केंद्र असल्याने मुलांना सक्षम नागरिक बनविण्यात सैनिकी शाळा मोलाची भूमिका बजावत असतात, असे ते म्हणाले.
यावेळी भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ऍप्लिकेशन्स अँड जिओ-इन्फॉरमॅटिक्स (BISAG-N) च्या सहकार्याने सुरू केलेल्या https://sainikschool.ncog.gov.in या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. 12 ऑक्टोबर 2021 पासून त्यावर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आजपर्यंत 137 अर्जदारांनी वेब पोर्टलवर नोंदणी केली आहे.