Now 100 per cent subsidy will also be available for fertilizers
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार
– कृषीमंत्री धनंजय मुंडे
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश
मुंबई : राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यासारख्या कामांना 100 टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील 100 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी घोषित केली आहे.
राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत मंत्री श्री. मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास 100 कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती देखील ट्विटर द्वारे दिली आहे.
राज्य सरकारने 06 जुलै, 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून या अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन 100 टक्के अनुदान देते.
यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार”