125 डेसीबलपेक्षा जास्त आवाजाचे साखळी फटाके उडविण्यास मनाई.
पुणे :- दिपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरचे पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 1 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून ते 30 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यावर रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण मनाई केली आहे.
या कालावधीत 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या आणि 125 डेसीबल पेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे सर्व साखळी फटाके उडविण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही रस्त्यावर किंवा रस्त्यापासून 50 फुटाच्या आत कोणतेही फटाके स्वैरपणे उडविणे किंवा दारु काम सोडणे किंवा फेकणे अगर आगी फुगे (फायर बलून) किंवा अग्नीबाण सोडणे, उडविणे असे कृत्य करणे, एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन विक्री व वापरण्यास मनाई करण्यात येत आहे.
साखळी फटाका 50 ते 100 तसेच 100 व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे 110 किंवा 115 व 125 डेसीबलपेक्षा जास्त असता कामा नये.
या आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनीयमाच्या कलम 131 प्रमाणे कायदेशीर शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.