14,000 posts will be recruited in the water resources department through outsourcing
जलसंपदा विभागात आउटसोर्सिंगद्वारे १४ हजार पदांची भरती करणार
सोलापूर: जलसंपदा विभागामार्फत आउटसोर्सिंग द्वारे पुढील एक -दोन महिन्यात चौदा हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पद भरली जाणार आहेत, त्यामुळे राज्यात सर्वत्र जलसंपदा विभागाला पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध होईल, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. सोलापूर जिल्हा जलसंपदा आढावा बैठकीत ते आज बोलत होते.
सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व नद्यांवर मोठ्या क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे प्रकल्प नियोजित आहेत. पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर प्रत्येकी बारा टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले ९ बॅरेजेस निर्माण करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या बॅरेजेसच्या लाभ क्षेत्रातली शेत जमीन सिंचनाखाली आल्यानं या भागातल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या घेण्यात आलेल्या जमिनीचा त्यांना योग्य मोबदला वेळेत मिळावा यासाठी जलसंपदा विभाग व महसूल विभागाच्या भूसंपादन शाखेनी एकत्रित येऊन शिबिराचे आयोजन करावे व संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करून त्यांना तात्काळ मोबदला देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देशही यावेळी श्री. पाटील यांनी दिले. तसेच असे शिबिर लवकर आयोजन करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क ही साधला.