An opportunity to brand Nashik globally through Youth Festival
युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकची जागतिकस्तरावर ब्रॅण्डिंग करण्याची संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या पूर्व तयारीचा आढावा
नाशिक : नाशिक शहरात 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार 12 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून राज्याची सांस्कृतिक परंपरा व नाशिक जिल्ह्याची जागतिकस्तरावर ब्रॅण्डिंग करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्या संधीचे आपण सर्वांनी सोने करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
तपोवन मैदान येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन स्थळाची आज पाहणी करून महोत्सवाच्या नियोजनाबाबत आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, नाशिक येथे होणाऱ्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अनुषंगाने मुख्य उद्घाटन कार्यक्रम हा तपोवन मैदान येथे होणार असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजन संदर्भात बैठका घेण्यात आल्या आहेत. या महोत्सवाच्या आयोजनासाठी 20 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या मॅस्कट व लोगोचेही अनावरण करण्यात आले आहे.
या महोत्सवासाठी देशाच्या विविध भागातून जवळपास 8 हजार युवा सहभागी होणार आहेत. त्यांच्या निवास व खानपान व्यवस्थेमध्ये कोणतीही उणीव राहणार नाही, याबाबत काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. हनुमाननगर येथील सुविचार स्पर्धा, युवा संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिर येथे सांघिक लोकनृत्य, वैयक्तिक लोकगीत व वक्तृत्व स्पर्धा, तर महात्मा फुले कलादालनात छायाचित्र स्पर्धा होणार आहे. गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात सांघिक लोकगीत व वैयक्तिक लोकगीत आणि उदोजी महाराज म्युझियम येथे यंग कलाकार शिबिर, पोस्टर मेकिंग व कथा लेखन असे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
तरुणाईला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न या युवा महोत्सवाच्या माध्यमातून केला जाणार आहे. महोत्सवासाठी शहराचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी अनेक उपक्रमांसह शहरात ठिकठिकाणी सजावटीचेही नियोजन करण्यात आले असून स्थानिक युवकांच्या सहभागातून वॉल पेंटिंग, लाइटिंग करण्यात येणार आहे. यासोबतच शहरातील स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनही यादृष्टीने उत्तम तयारी करत असून सर्वच यंत्रणांच्या प्रयत्नातून हा युवा महोत्सव अविस्मरणीय होईल, यात शंका नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी युवा महोत्सव यशस्वी होण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली, तर युवा महोत्सवात आयोजित कार्यक्रमांच्या तयारीची माहिती, क्रीडा आयुक्त यांनी दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com