40 व्या शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात प्रकाशन विभागाचा सहभाग.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा प्रकाशन विभाग 40 व्या शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात (SIBF 2021) सहभागी होत आहे. हा जगातील सर्वात प्रसिद्ध पुस्तक मेळाव्यांपैकी एक आहे. शारजाह बुक अथॉरिटी (SBA) द्वारे आयोजित 11 दिवसीय आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा 3-13 नोव्हेंबर 2021 दरम्यान शारजाहच्या एक्स्पो सेंटर येथे आयोजित केला जात असून 2021 चे साहित्यासाठी नोबेल पुरस्कार जिंकलेले टांझानियाचे कादंबरीकार अब्दुल राजक गुरनाह आणि नेटफ्लिक्स वरील ‘मनी हेस्ट’ मालिकेचे पटकथा लेखक यांच्यासह जगभरातील साहित्यिक दिग्गजांची उपस्थिती असेल. ‘ नेहमीच एक योग्य पुस्तक असते’ ही या वर्षीची संकल्पना आहे.
दुबईतील भारताचे महावाणिज्यदूत डॉ. अमन पुरी यांच्यासमवेत कौन्सुल (प्रेस, माहिती, संस्कृती आणि श्रम) तडू मामू यांनी शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात प्रकाशन विभागाच्या स्टॉलचे उद्घाटन केले. डॉ. पुरी यांनी प्रकाशन विभागाच्या प्रकाशन क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत ते म्हणाले , “विविध विषयांवर उच्च दर्जाची पुस्तके प्रकाशित करून प्रकाशन विभाग महत्त्वपूर्ण योगदान देत आहे,” आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.
पुस्तक मेळावा 2021 मधील आंतरराष्ट्रीय सहभागामध्ये भारत आघाडीवर असून 1566 प्रकाशकांमध्ये भारतातील प्रकाशन विभागासह 87 प्रकाशक सहभागी झाले आहेत,. बहुप्रतिक्षित आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्याने अमिताव घोष, चेतन भगत आणि अमेरिकेतील मानसोपचार शास्त्रज्ञ, STEM प्रवर्तक आणि 2020 मध्ये टाइम मासिकाने ‘किड ऑफ द ईअर’ म्हणून गौरवलेल्या गीतांजली राव यांच्यासारख्या दिग्गजांना एकाच छताखाली आणले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना प्रकाशन विभाग येत्या काळात वाचक आणि पुस्तक रसिकांसाठी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या इतिहासावरील 150 हून अधिक पुस्तके घेऊन येणार आहे. राष्ट्रपती भवनावरील पुस्तके आणि पंतप्रधानांची भाषणे जी केवळ प्रकाशन विभागाद्वारे प्रकाशित केली जातात अशी पुस्तके तसेच कला आणि संस्कृती, भारताचा इतिहास, प्रख्यात व्यक्ती, भाषा आणि साहित्य, गांधीवादी साहित्य, धर्म आणि तत्त्वज्ञान आणि बालसाहित्य यासारख्या विषयांवरील विविध भारतीय भाषांमधील पुस्तके आणि मासिके वाचकांना वाचायला मिळतील.