5G technology will make the army faster
५ जी तंत्रज्ञानामुळे सैन्य वेगवान होणार – डॉ. एल. सी. मंगल
MIMO आणि ५ जी कम्युनिकेशनवर विद्यापीठात राष्ट्रीय कार्यशाळा
पुणे : ५ जी तंत्रज्ञानामुळे युद्धस्थितीत प्रतिसाद वेळ (Response time) कमी होईल. या जलद निर्णय प्रक्रियेमुळे भारतीय सैन्य येणाऱ्या काळात अधिक वेगवान होणार आहे, असे प्रतिपादन डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स ऍप्लिकेशन लॅबोरेटरी, डीआरडीओ, डेहराडूनचे संचालक डॉ. एल.सी. मंगल यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपला अमृत महोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणशास्त्र विभागातर्फे MIMO तंत्रज्ञान आणि ५ जी कम्युनिकेशन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सैन्यातील भविष्यातील संप्रेषण’ या विषयावर डॉ. मंगल बोलत होते.
या कार्यशाळेचे उद्धाटन कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जेएटीसी-आयआयटी दिल्लीचे संचालक डॉ. एम. एच. रहमान, क्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि संशोधन (समीर), मुंबईचे महासंचालक डॉ. पी. हनुमंता राव, एआरडीई, डीआरडीओ, पुणेचे समूह संचालक डॉ. बी. बी. पाधी, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, पुणेचे डीन डॉ. के. पी. रे, व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीज, बंगलोरचे ॲप्लिकेशन इंजिनीअर श्री. सुमित अग्रवाल, स्कूल ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड मॅथेमॅटिकल सायन्सेस, डीआयएटी, पुणेचे संचालक प्रा. मनीषा नेने, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले, प्रा.विकास माठे, प्रा.ए.डी.शाळीग्राम, डॉ. प्रणोती बनसोडे-गायकवाड उपस्थित होत्या.
भारतीय सैन्यात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. पुढील १० वर्षात ५ जी नॉन टेरिटेरियल नेटवर्कचा वापर करून सैन्याचे संपूर्ण संप्रेषन हे सॅटेलाईटद्वारे होईल. यामुळे नेटवर्कमधील अडथळे कमी झाल्यामुळे जमीनीवरील स्वयंचलित (रोबोटिक) यंत्र, वाहनांना अधिक जलद गतीने हाताळता येणार असल्याचे डॉ. एल.सी. मंगल यांनी सांगितले. तर मानवसहित आणि मानवरहित विमान, युद्धनौका, सबमरीन यांचे जमीनीवरील संप्रेषणाची गुणवत्ता यामुळे वाढणार असल्याचेही ते म्हणाले. ५ जीचे कस्टमायझेशन करून विशिष्ट नेटवर्क जॅम करणे, विशेष मिशनसाठी नेटवर्क वैयक्तिकृत करण्यासारखे उपक्रम राबवता येणार असल्याची माहिती मंगल यांनी यावेळी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ फ्रंट एंड संशोधन क्षेत्रात काम करत आहे. विद्यापीठातील विविध विभागात सोलर सोल्स्टिस, हायड्रोजन जनरेशन, ग्रीन पेटंट टेक्नोलॉजी, वॉईस टेक्नोलॉजी यासारख्या विविध विषयांवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून या संशोधनाचा फायदा देशाच्या विकासासाठी होणार असल्याचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांनी यावेळी सांगितले.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत ५ जी आणि MIMO तंत्रज्ञानाशी संबंधित विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत देशभरातून ५ जी तंत्रज्ञान तसेच दूरसंचार विषयांमध्ये संशोधन करणारे डीआरडीओचे अनेक शास्त्रज्ञ, अध्यापक आणि संशोधक विद्यार्थीं सहभागी झाले होते. यावेळी डॉ. आदिती जोशी, डॉ. शामल चिनके, श्रीमती. स्वाती जाधव, डॉ.भाग्यश्री जोशी, डॉ.श्वेता जगताप, श्रीमती. पल्लवी मेश्राम, प्रा.ए.डी.शाळीग्राम, प्रा.डी.सी.घारपुरे, प्रा.शशिकला गांगल, प्रा.सुभाष घैसास हे उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com